
आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील चर्चासत्र संपन्न
मुंबई : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत. मात्र या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोगनिदान व उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या ‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील एक दिवसाच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या दोन शतकांमध्ये लसीकरण, बधिरीकरण, मेडिकल इमेजिंग, प्रतिजैविके, अवयव प्रत्यारोपण, स्टेम सेल थेरपी इत्यादी महत्वपूर्ण स्थित्यंतरे झाली आहेत . कृत्रिम प्रज्ञा हे क्रांतिकारी तंत्रज्ञान देखील वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारे असेल असे सांगून कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावे, असे राज्यपालांनी सांगितले. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने व्हावा तसेच रुग्णाच्या आजाराबाबत योग्य ती गोपनीयता जपली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस माजी फेलो दिवंगत डॉ बी के गोयल व डॉ एल एच हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ केवल तलवार, डॉ. पी. व्ही. देसाई, डॉ. बी. एस. सिंघल, डॉ. सरोज गोपाल, डॉ. अशोक गुप्ता, डॉ. देवेन तनेजा, डॉ. नादीर भरुचा, डॉ. सुनील पंड्या, डॉ. सतीश खाडिलकर, डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले.
चर्चासत्राला नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. शिव कुमार सरीन, नियोजित अध्यक्ष डॉ. दिगंबर बेहरा, चर्चासत्र आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश खाडिलकर, सहाध्यक्ष डॉ. अशोक गुप्ता, बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ. राजकुमार पाटील, हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. अनिल शर्मा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.