ताज्या घडामोडी

महा आवास अभियान ग्रामीण : सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा – अपर आयुक्त अनिल रामोड

पुणे : महा आवास ग्रामीण अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा, यासाठी प्रसंगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली ‘सर्वांसाठी घरे’ योजना यशस्वी करावी. त्यामुळे गरीब व सामान्य जनेतेचे घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी येथे केले.

महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत 2021-22 चे पुरस्कार वितरण तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या अमृत महा आवास अभियान 2022-23 ची विभागस्तरीय शुभारंभ कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या झुंबर हॉल येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे पुणे आयुष प्रसाद, कोल्हापूर संजयसिंह चव्हाण, सोलापूर दिलीप स्वामी, सातारा ज्ञानेश्वर खिलारी, राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक निलेश काळे, महसूल उपायुक्त नयना बोंदार्डे -गुरव, सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा ऊंटवाल- लड्डा, विकास उपायुक्त विजय मुळीक, विविध पंचायत समिती, ग्राम पंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री.रामोड म्हणाले, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी पुणे विभागात 2021-22 साठी महाआवास अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात विभागाचे उत्कृष्ट कार्य झाले आहे. यासाठी शासकीय यंत्रणेसोबत लोकसहभागदेखील महत्वाचा आहे. केंद्रीय योजनांसोबत कृतीसंगम करुन योग्य लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे. घरकुल विषय हा अतिशय संवेदनशील असून संबधित यंत्रणांनी तो संवेदनशीलतेनेच हाताळावा. आपल्याकडील प्रलंबित कामे शंभर टक्के पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे.

  जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी व योजनेत सहभागी अधिकारी यांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कारांचे वितरण यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना उपसंचालक निलेश काळे यांनी सांगितले, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध गृहनिर्माण योजनांच्या विविध टप्प्यांची अंमलबजावणी योग्य वेळेतच करावी, अन्यथा दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. योजनेंतर्गत लँड बँकसारखी कामे लक्षपूर्वक करावीत. तर सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी, आवास योजना राबविताना गरीब व सामान्य जनतेला डोळयासमोर ठेवून सर्व यंत्रणांनी काम करावे, अजून चांगले काम करणे शक्य आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी योजना राबविताना त्यांच्या पूर्ततेसाठी प्रसंगी प्रॅक्टीकल मार्ग अवलंबावा तसेच योजनांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्हयातील संबधितांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याचेही सांगितले. तसेच माळशिरसचे उप सभापती, उपसरपंच उमेश चव्हाण, ग्राम विकास अधिकारी विजय देशमुख यांचीही भाषणे झाली.     

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास उपायुक्त विजय मुळीक यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी पुणे विभागामार्फत या अभियानाच्या यशस्वितेसाठी केलेल्या उपक्रमाची, कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली आणि अभियान यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर सहायक विकास आयुक्त डॉ.सीमा जगताप यांनी आभार मानले. 

कार्यक्रमाला पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालीनी कडू, साताऱ्याच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सांगलीचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, सोलापूरचे प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, कोल्हापूरच्या प्रभारी प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, संबधित गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.

पुरस्कारांचा तपशील

1) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- प्रथम पुरस्कार कोल्हापूर, द्वितीय पुरस्कार- सोलापूर, तृतीय पुरस्कार-पुणे 

राज्य पुरस्कृत आवास योजना- प्रथम पुरस्कार-कोल्हापूर, द्वितीय पुरस्कार-सोलापूर, तृतीय पुरस्कार-सातारा

2) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुके- प्रथम पुरस्कार- गगनबावडा (कोल्हापूर), द्वितीय पुरस्कार-आजरा, गडहिंग्लज व शाहुवाडी (कोल्हापूर), तृतीय पुरस्कार-राधानगरी (कोल्हापूर) 

राज्य पुरस्कृत आवास योजना-प्रथम पुरस्कार-अक्कलकोट (सोलापूर), द्वितीय पुरस्कार-सांगोला (सोलापूर), तृतीय पुरस्कार-माळशिरस (सोलापूर)

3) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम पुरस्कार- निंबर्गी (ता.दक्षिण सोलापूर,जि. सोलापूर), द्वितीय-जिंती (ता. पाटण, जि. सातारा), तृतीय-मंद्रुप (ता.दक्षिण सोलापूर,जि.सोलापूर) राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम पुरस्कार- मारुल तर्फे पाटण (ता. पाअण जि. सातारा), द्वितीय पुरस्कार-मुळगांव (ता. पाटण जि.सातरा), तृतीय-भांडारकवठे (ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर)

4) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधे शासकीय जागा उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके- प्रथम पुरस्कार-माळशिरस (सोलापूर), द्वितीय पुरस्कार- फलटण (सातारा), तृतीय पुरस्कार- वाळवा (सांगली)

5) शासकीय जागा उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके- प्रथम पुरस्कार- फलटण (सातारा)

6) वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण -प्रथम पुरस्कार- अक्कलकोट (सोलापूर), द्वितीय-मोहोळ (सोलापुर) 7) वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके राज्य पुरस्कृत आवास योजना- प्रथम पुरस्कार- अक्कलकोट (सोलापूर), द्वितीय पुरस्कार – मोहोळ (सोलापूर) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *