मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड कुरणी दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पुलावर चार व दोन्ही बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीस धोकादायक असलेले हे खड्डे तातडीने पाटबंधारे उपविभाग निढोरी यांनी मुजवण्याची वांरवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ या खड्यात आज विविध सामाजिक संघटनानी वृक्षारोपन करून आंदोलन केले.
मुरगूड कुरणी दरम्यान, वेदगंगा नदीवर १९६७ साली पूल बांधण्यात आला आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी या पुलाची डागडुजी झाली होती. या पुलामुळे नदीपलीकडील सुमारे १५ गावांना मुरगूड बाजारपेठेत येणे सोईचे ठरते. त्यामुळे या मार्गावरून
वाहतूक वाढली आहे. या पुलावर चार ठिकाणी व पुलाच्या दोन्ही बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. दुचाकी व चारचाकीधारकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागते.
वेळीच पुलावरील खड्डे भरले नाही तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याची देखभाल दुरुस्ती पाटबंधारे उपविभाग निढोरी यांच्याकडे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी हे खड्डे तातडीने भरून घ्यावेत, तसेच संरक्षण कठड्याचा तुटलेला पिलर उभा
करावेत अन्यथा यापेक्षा मोठं उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा रिपब्लीकन पार्टीचे बाळसो कांबळे, सिंकदर जमादार, प्रदिप वर्णे, संजय घोडके आदिनी निवेदनाद्वारे दिला आहे.