कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यात राजर्षी शाहू सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र अशी एकूण ७५ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत नागरिकांना महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले वितरित केले जातात.
त्यासाठी शासनाने निर्धारित केलेले सेवा शुल्क घेणे बंधनकारक आहे, मात्र काही केंद्र चालक निर्धारित शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, कागल तहसील कार्यालयाने एक प्रेस नोट जारी करून नागरिकांना सतर्क केले आहे.

तहसील कार्यालयाने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, विविध दाखल्यांसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क हे दर फलकावर नमूद केलेले आहे. नागरिकांनी फक्त तेवढेच शुल्क द्यावे.
कोणत्याही महा ई सेवा किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालकाने शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास किंवा अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास, तात्काळ तहसील कार्यालय, कागल येथे लेखी स्वरूपात पुरावासह तक्रार अर्ज सादर करावा. तक्रार tahsildarkagal@gmail.com या ईमेलवर देखील पाठवता येईल.
जर कोणत्याही महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालकाने नागरिकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित चालकावर आपले सरकार सेवा केंद्र रद्द करण्याबाबतची कारवाई केली जाईल, असा इशाराही तहसील कार्यालयाने दिला आहे. सर्व महा ई सेवा केंद्र चालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे