वैरणीचा भारा घेऊन पडल्याने यमगे येथील शेतकऱ्याचा मृत्यू


मुरगूड ( शशी दरेकर )
: यमगे ता. कागल येथे वैरणीचा भारा घेऊन येताना पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना यमगे येथे घडली. नामदेव दत्तात्रय मिसाळ (वय ५० वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नांव आहे. मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नामदेव मिसाळ हे गावाच्या दक्षिण टोकावर असलेल्या ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस वाण्याचे पठार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावरील पठारावर जनावरांकरीता वैरण आणण्यासाठी सकाळी ७. ३० वाजता घरातून गेले होते. या पठारावरील स्वतःच्या मालकीच्या शेतातील वैरण कापल्यानंतर वैरणीचा भारा डोक्यावर घेऊन ते डोंगर उतारावरून गावाच्या दिशेने येत असताना सकाळी ९. ३० वाजन्याच्या सुमारास त्यांचा पाय घसरल्यामुळे डोक्यावरील वैरणीच्या भाऱ्यासह ते खाली कोसळले. वर्मी लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची वर्दी किरण वसंत पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली असून सपोनि विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिपक मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
मयत नामदेव मिसाळ यांच्या पश्चात पत्नी आई वडील दोन मुले भाऊ असा परिवार आहे.
……………………………….
……………… …………………

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!