मुरगूड ( शशी दरेकर ) – वीजे शिवाय प्रकाश व उष्णतेची ऊर्जा मिळत नाही. त्यासाठी वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून वीज पुरवठा अखंडीत ठेवतात त्यांच्या योगदानाची व वीजेची किंमत वीज खंडीत झाल्यावर समजते. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रवचनकार हभप डॉ़. श्रीकृष्ण देशमुख यांनी येथील कृतज्ञता कार्यक्रमात केले.
तांत्रीक बिघाडामूळे खंडीत वीज पुरवठा झाल्यावर महापूर काळात जीव धोक्यात घालून पाण्यातूनही वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या व प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या वीज तांत्रीक कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार येथील अंबाबाई देवालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी डाॅ. देशमुख बोलत होते माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर प्रमुख उपस्थित होते.
धाडसी व प्रामाणिक कामाबद्दल वीज महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रकाश पाटील , प्रधान तंत्रज्ञ भिकाजी चौगले, वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश कोळी, वैभव लोंढे, शहाजी खतकर, सतीश रणवरे, सागर गुजर, भरत पाटील यांचा तसेच शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वाती शिंदे आदींचा डॉ . श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात संतोष वंडकर यांनी स्वागत केले. नामदेवराव मेंडके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास दत्तात्रय साळोखे, आनंदा कदम, पांडुरंग चौगले, राजू चव्हाण, महेश खंडागळे, विश्वास रावण, जगदिश गुरव आदि उपस्थित होते. प्रा.सुनिल डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप भारमल यांनी आभार मानले.