साके (सागर लोहार)
केनवडे ता. कागल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संजयबाबा घाटगे गटाच्या केमिकल विरहित जॅगरी पावडर निर्मिती करणाऱ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामासाठी विनाकपात एकरकमी २९०३ ऊस दर देण्याचा निर्णय सर्व संचालकांच्या आयोजित बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली.
केनवडे तालुका कागल येथे श्री अन्नपूर्णा शुगरच्या कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री घाटगे पुढे म्हणाले, आमच्या गटाच्या शेतकऱ्यांवर ऊस तोडणी वेळी नेहमीच अन्याय होत होता त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हा कारखाना उभारला आहे. मी सभासदांशी नेहमीच बांधील राहिण तसेच कारखानदारांच्या ऊस दराशी कधीही स्पर्धा करणार नाही. तोडणी वाहतूक यंत्रणा ,ऊस उत्पादक, अधिकारी व सेवक वर्ग सभासद या सर्वांचे हित जोपासण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दत्तोपंत वालाववलकर म्हणाले, अनेक संकटांवर मात करून कारखान्यांची उभारणी केली आहे. पहिल्याच वर्षी चांगला दर जाहीर केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाच्या वतीने संस्थापक, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे आभार मानले.
बैठकीस गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे,संचालक शिवसिंग घाटगे, धनाजी गोधडे, सुभाष करंजे ,एन.डी पाटील, राजू भराडे आदी उपस्थित होते. स्वागत के.के. पाटील यांनी केले. आभार तानाजी पाटील यांनी मानले.
चांगला दर कायम देवू…
अन्नपूर्णा शुगर नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काटकसरीने कारभार करेलच त्याचबरोबर शेतकऱ्यांना अपेक्षित असा चांगला दरही कायमपणे देण्यास बांधील राहील असा ठाम विश्वास गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे यांनी व्यक्त केला.