बामणी (प्रतिनिधी) : बामणी ता. कागल येथील पियुष जयराम मगदूम याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत
ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुल, मुल येथे या स्पर्धा झाल्या.
६७ किलो खालील वजन गटात तो या स्पर्धेत कोल्हापूर विभागामार्फत सहभागी झाला होता. एकूण झालेल्या सहा फेऱ्यांमध्ये त्याने नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर,पुणे, मुंबई येथील मल्लांना धूळ चारली. अंतिम सामन्यात लातूरच्या समाधान भोसले याच्यावर विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
बेलवळे येथील महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजचा तो विद्यार्थी आहे. कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनी येथे तो सराव करीत आहे. त्याला क्रीडा शिक्षक श्री शिंदे वस्ताद कृष्णात पाटील, वाकरेकर, महादेव कोईगडे, जयराम मगदूम, यशवंत वाडकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
नागपूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील,जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदींच्या हस्ते त्याला बक्षीस वितरण करण्यात आले.