कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय तसेच राज्यातील विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
ते म्हणाले इंडिया टुडे सी वोटरचा सर्व्हे मी देखील वाचला. त्यामध्ये साधारणत: स्पष्ट दिसतंय की, आज जो देशामध्ये सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याविरुद्ध जनमत आहे. तसेच महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सत्ताधारी पक्षाच्या हातून सत्ता जाईल असे दिसणारी आहे. अर्थात हा सर्व्हे आहे. या एजन्सीचे यापूर्वीचे सर्व्हे आपण पाहिले 10 वर्षांपूर्वीचे, पाच वर्षांपूर्वीचे.. तर ही जी एजन्सी आहे त्यांची अचूकता बऱ्याचदा सिद्ध झाली आहे. पण मी एकदम त्याच्यावर जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असे दिसतेय.
काँग्रेसच्या जागा देशात वाढतील असे दिसत आहे. उदा. कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. त्याची माहिती आम्ही अधिक घेतली. त्यात आम्हाला स्वच्छ असे दिसतंय की, कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही. लोक त्या ठिकाणी परिवर्तनाला उत्सुक आहेत. असे चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल. पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याची निश्चित माहिती आमच्याकडे नाही.
विरोधकांची मोट बांधण्यासाठी सर्व एकत्र काम करत आहे मात्र सध्य स्थितीबाबत अद्याप काही सकारात्मक सांगण्यासारखे काही नाही. मी स्वत: अनेकांशी बोलतो आहे. अनेकांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण काही ना काही तरी स्थानिक मुद्दे आहेत. आता उदाहरणार्थ केरळमध्ये आज डाव्यांचं आणि राष्ट्रवादी व अन्य सगळे एकत्र येऊन आमचं सरकार तिथे आहे. पण आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकुल नाही. या अडचणी आम्हाला सोडवाव्या लागतील. सुदैवाने दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होईल. सगळेच लोक भेटतील आणि त्यामुळे हा संवाद सुरू करता येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. यावर चर्चाच होऊ शकत नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय यावर कोण काही बोलतेय याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील उपस्थित होते.