कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील 26 ग्राम पंचायतीचे मतदान किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडले. संवेदनशील गावात मोठी पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस प्रमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकिय मातब्बर नेते मंडळी यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मोठ्या ईर्षेने 88.75टक्के इतके मतदान झाले.
कागल तालुक्यात ग्रामपंचायतीचे आज सकाळपासून मोठ्याने इर्शेने मतदान झाले. 26 ग्रामपंचायत मध्ये पुरुष मतदार 28 हजार 347 तर स्त्री मतदार 27 हजार 188 असे एकूण 55 हजार 535 मतदार आहेत. 26 सरपंच पदासाठी मतदान झाले. यामध्ये 17 गावांमध्ये एकास -एक सरळ लढत झाली. तर नऊ गावांमध्ये सरपंच पदासाठी उमेदवारांची संख्या अधिक होती. . तसेच 250 सदस्यांपैकी चार उमेदवार बिनविरोध झाले. तर 246 सदस्यांसाठी मतदान पार पडले. बामणी येथे एकाच कुटुंबातील व्यक्ती मतदानासाठी एकत्रित जात असताना पोलीस कर्मचारी व मतदार यांच्यात बाचाबाची झाली.
कसबा सांगाव, हमीदवाडा, कापशी ,बोरवडे, बाचणी ही गावे संवेदनशील असल्याने, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. शेतमजुर व अन्यमजुरानी सकाळी- सकाळीच मतदान करुन कामावर हजेरी लावली. सकाळी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. कागल तालुक्यातील राजकिय ईर्षेनुसार कार्यकर्ते झपाटुन कामात मग्न होते. मतदार खेचुन आणण्यात गटबाजीची ईर्षा दिसुन येत होती.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुषमा ठोकडे यांचेसह निवडणूक विभाग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. वयोवृद्ध व रुग्ण मतदारांसाठी विशेष वाहनांची सोय केली होती. पुरुष मतदार 25360व महिला मतदार 23928 एकुण 49288 मतदारानी केंद्रावर जाऊन आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावला.