सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या – माजी खास. राजू शेट्टी
कागल : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात या वर्षी उन्हाळी सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे सोयाबीनचे पीक वाया गेले असून तीन जिल्ह्यातील जवळपास ३ हजार हेक्टरहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खास. राजू शेट्टी यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
वास्तविक पाहता सोयाबीनची 726 ही जात जास्त वजनामुळे उताऱ्यावर परिणाम करत असून पावसाळ्यामध्ये याची उत्पादकता चांगली येते. सध्या या तीनही जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हेक्टरी ३ क्विंटलपर्यंत निघाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या महाबीज मंडळाकडूननही या बियाण्यांचे वाटप करत असताना जादा तापमानात सदर पिकाचे उत्पादन येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगणे गरजेचे होते. मात्र महाबीज मंडळामध्ये बसलेल्या पांढरपेशी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाबीज मंडळाच्या या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे राज्य शासनाने तातडीने यासर्व सोयाबीन उत्पादकांचे पंचनामे करून हेक्टारी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.