कागल (प्रतिनिधी) : कागल ते कोल्हापूर जाणाऱ्या महामार्गावर लक्ष्मी टेकडी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी रोशन सुंदरसिंग लोधी (रा. तिन्सी, जि. सागर, मध्यप्रदेश) हा आपला ताब्यातील टाटा ट्रक (क्र. यूपी-७८/एचटी-५०४४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवत होता. यादरम्यान त्याने समोरून जाणाऱ्या टीव्हीएस झेस्ट दुचाकीला (क्र. एमएच-०९/एचजी-५३५६) जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील स्वार सौ. सिमा विनायक रेडेकर (वय ३२, रा. आनूर, ता. कागल) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेबाबत विनायक मधुकर रेडेकर (वय ३३, रा. आनूर, ता. कागल) यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून आरोपी रोशन लोधी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.