पेठवडगाव (सुहास घोदे) : पेठवडगाव नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज विशेष निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले आप्पासाहेब जगन्नाथ पाटील यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची घोषणा होताच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले.
नगरपरिषद सभागृहात संपन्न झालेल्या या निवड प्रक्रियेप्रसंगी पेठवडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. विद्याताई पोळ, उपनगराध्यक्ष अभिजीत गायकवाड आणि मुख्याधिकारी सुमित जाधव प्रमुख उपस्थित होते. प्रशासकीय नियमानुसार रिक्त जागेवर पात्र उमेदवाराची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली,

ज्यामध्ये आप्पासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवड जाहीर होताच सभागृहाबाहेर जमलेल्या आप्पासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. तसेच उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक आप्पासाहेब पाटील यांनी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.