मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे IQAC आणि सॉक्रेटिस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रथम फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ‘करिअरसाठी हमखास संधी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालय आणि प्रथम फाउंडेशन, महाराष्ट्र ( कोल्हापुर विभाग) यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑन-जॉब ट्रेनिंग व रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रथम फाउंडेशनच्या कागल विभागाच्या समन्वयक सौ. नसीबा अनुरे यांनी विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती दिली. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम पूर्णतः मोफत असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बदलत्या रोजगार क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये, विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम, करिअरच्या संधी तसेच प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबत माहिती घेतली. आजी व माजी विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या विविध प्रशिक्षण व रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन स्वतःच्या करिअरला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रथम फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सौ. माणिक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनिषा पाटील यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पी. आर. फराकटे, प्रा. डी. ए. सरदेसाई, तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. दिपाली सामंत यांनी मानले.