कागल : दि.२७/०८/२०२६ रोजी कागल नगरपरिषद कागल अंतर्गत असणाऱ्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर, कागल यांच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ हा भावनिक व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी कागल पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांचे औक्षण करून त्यांना प्रेमाने राख्या बांधल्या. देशाच्या व समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अविस्मरणीय ठरला.

यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. सागर नदाफ, शिक्षकवृंद, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालक उपस्थित होते.
‘राखी ही केवळ प्रेमाची आणि आपुलकीची निशाणी नसून समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे,’ असा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.