कागल नूतन बस स्थानक विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

कागलच्या 250 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करणार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील कागल नूतन बस स्थानक हे विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. कागलच्या पर्यटनासाठी सुमारे 250 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास प्रस्तावासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. पर्यटन विभागाच्या कामांमध्ये कागलच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Advertisements

कागल येथील नूतन बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू समूह ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाडगे, माजी आमदार संजयबाबा घाडगे, कागल नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, विक्रमसिंह भैय्या पाटील, विरेंद्र मंडलिक, कागल नगरपरिषदेचे नगरसेवक, कोल्हापूर एस.टी. विभागाच्या विभागीय नियंत्रण वृषाली भोसले, प्रादेशिक अभियंता नागेश कुलकर्णी, यंत्र अभियंता अनंत कुलकर्णी, स्थापत्य कंत्राटदार एस.एन.पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दूरदृष्टीचे नेतृत्व मिळाले की भागाचा, मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कागलचे हे नूतन बस स्थानक आहे. बस स्थानकाशी संलग्न मार्केट कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे, यातून मिळणाऱ्या भाड्यातून बस स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे.

या बस स्थानकाचा परिसर आणि इमारत दोन्हीही स्वच्छ आणि सुंदर ठेवावा, यासाठी त्यांनी यावेळी आवाहन केले. पर्यटन विकासाविषयी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूरला लागूनच विमानतळ असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा, पन्हाळा, महालक्ष्मी मंदिर, आंबा घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. या पर्यटकांची पावले कागलकडे वळायची झाली तर कागलला दर्जेदार पर्यटन स्थळे विकसित करणे आवश्यक आहे, हे ओळखून 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला पर्यटन विभागाची मान्यता देण्यात येईल.

Advertisements

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कागलचे बस स्थानक अत्यंत दुरावस्थेत होते ते सुसज्ज व्हावे, अशी अनेक काळापासूनची आपली इच्छा होती. त्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला. त्यातून हे अद्ययावत असे उत्कृष्ट बस स्थानक झाले आहे. यामध्ये हिरकणी कक्षासह सर्वसोईंनी युक्त सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे.

कै. जयसिंगराव घाटगे यांच्या नावाने असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तो पर्यटन विभागाने मार्गी लावावा. तसेच एकात्मिक पर्यटन विकास आराखडा प्रस्तावही मार्गी लावावा, अशी विनंती त्यांनी केली.

नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या वन विभागाच्या 200 एकर जमिनीवर सुद्धा पर्यटन विकासासाठी प्रयत्न व्हावेत. उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या नूतन इमारतीची योग्य ती निगा राखा, तंबाखू गुटखा खाऊन परिसर अस्वच्छ करू नका, एसटीही आपल्या सर्वांची रक्तवाहिनी आहे तिला जपूया, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कागल लोकनियुक्त नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, नगरसेवक प्रविण काळबर, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, विरेंद्र मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केली.

प्रास्ताविकात कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रण वृषाली भोसले म्हणाल्या, कागल येथील नूतन बस स्थानक  इमारतीसाठी सुमारे 5 कोटी 50 लक्ष इतका मंजूर निधीमधून बांधण्यात आला आहे. या बस स्थानकात दहा फलाट असून यामध्ये पास आरक्षण, हिरकणी कक्ष, चालक-वाहक विश्रांती गृह, स्वच्छतागृह, अतिथीकक्ष, पोलीस कक्ष, सुरक्षा कक्ष इत्यादी सुविधासह सुसज्ज असे बस स्थानक बांधण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत कागल नूतन बसस्थानकात फीत कापून कोनशिला अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कागल व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांनी मानले. यावेळी एस.टी. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, एस.टी. विभागाच्या संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!