कागल: राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत कागल तालुक्यात रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाली.
या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील ५ वर्षांखालील तब्बल १५,४३९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब मोफत देण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन
या विशेष मोहिमेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. हसनराव मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते जिल्हा परिषद दवाखाना, कागल येथे बालकांना लस पाजून करण्यात आले.

याप्रसंगी केडीसीसी बँकेचे संचालक मा. श्री. प्रताप उर्फ भैय्या बाबा माने, नगरसेवक सुशांत कालेकर, बाळामो माळी, सामाजिक कार्यकर्ते बंडा बारड, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शारदा भास्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई, डॉ. शोभा भोई, डॉ. अश्विनी राजमाने, आरोग्य सहाय्यक नमीर नाईक, अधीक्षक राम सातवेकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला. यामध्ये:
कापशी केंद्र: जि. प. अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत.
सिद्धनेर्ली केंद्र: पं. स. सभापती सौ. सुवर्णा पाटील.
चिखली केंद्र: जि. प. सदस्या सौ. शिवानी भोसले.
अनुर उपकेंद्र: जि. प. सदस्य श्री. काका सावडकर.
बोरवडे (पिंपळगाव बु.): जि. प. सदस्या श्रीम. शोभाताई फराकटे.
सावर्डे बु.: पं. स. उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील यांच्यासह सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
दुर्गम भागात घरभेटींवर भर
मोहीम यशस्वी करण्यासाठी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आणि गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्यासह विविध विभागांचे सहकार्य लाभले. तालुक्यातील २ ग्रामीण रुग्णालये, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३४ उपकेंद्रांमध्ये १४४ पोलिओ बूथ उभारण्यात आले होते.
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण व दुर्गम भागात घरभेटी देऊन, तसेच स्थलांतरित व वंचित कुटुंबांतील बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलिओ डोस देण्यात आला. तसेच पालकांना बालकांचे आरोग्य व नियमित लसीकरणाबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.