सहा लाख रुपयांची मागणी, मारहाण व मानसिक छळ केल्याचा आरोप ; मुरगूड पोलिसांत तक्रार
मुरगूड (शशी दरेकर) : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राणी सचिन तापेकर (वय ३०, मूळ रा. कात्रे गल्ली, सोनाळी, ता. कागल, सध्या रा. आणगोळ, ता. खानापूर, जि. बेळगाव) यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सचिन शिवाजी तापेकर, सासू कमल शिवाजी तापेकर व सासरे शिवाजी तापेकर (सर्व रा. कात्रे गल्ली, सोनाळी, ता. कागल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाह झाल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी आरोपींनी घरगुती किरकोळ कारणांवरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच माहेरच्या लोकांनी लग्नात योग्य मानपान केला नसल्याचे सांगत माहेरकडून सहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणल्याशिवाय नांदवणार नसल्याचे सांगून आरोपींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याशिवाय, फिर्यादीला घरात येण्यास मज्जाव करणे, घटस्फोट देण्यास भाग पाडणे तसेच वारंवार दमदाटी करून मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “आमच्या घरात येऊ नकोस, आलीस तर बघून घेऊ,” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुढील तपास पोहेकॉ सचिन पारखे करीत आहेत.