कागल पंचायत समितीची मासिक सभा संपन्न

कागल (प्रतिनिधी) : कागल पंचायत समितीची मासिक सभा मंगळवार, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी सभापती मा. सौ. सुवर्णा शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेमध्ये विकासकामांचा आढावा घेण्यासोबतच तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.

Advertisements

महत्त्वाचे ठराव आणि सत्कार

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान सर्वप्रथम कागल तालुक्याला मिळाल्याबद्दल, नूतन अध्यक्षा मा. सौ. शिल्पाताई शशिकांत खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव सदस्य श्री. दीपक सोनार यांनी मांडला, ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच, ‘घर घर संविधान’ मोहिमेअंतर्गत अनुसूचित जाती व उपयोजना अंतर्गत लाभार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेच्या १५ फोटो फ्रेमचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements

आरोग्य आणि कृषी विभागाला सूचना

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव: तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या अभियानाची माहिती दिली. ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या: कृषी सहाय्यक वेळेवर गाठीभेटी घेत नसल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध करून देण्याचे आणि ‘पीएम किसान’ योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व कृषी सहाय्यकांची तातडीने बैठक घेण्याचे आदेश सभापतींनी दिले.

अंगणवाडी तपासणी: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाड्यांना अचानक भेटी देऊन तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

गॅस वितरण: ग्रामीण भागातही २५ दिवसांच्या आत गॅस सिलेंडरचे वितरण व्हावे आणि वितरणातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने कडक पावले उचलावीत, असे सांगण्यात आले.

पाणी नियोजन: दूधगंगा धरणात सध्या ९.१७ टीएमसी पाणीसाठा असून, उन्हाळ्याची तीव्रता पाहता शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले.

शिक्षण: जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी पालकांशी संवाद साधण्याचे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्याचे सभापतींनी जाहीर केले.

कॅशलेस कार्ड सुविधा: ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी व रेल्वे प्रवासाकरिता ‘NCMC’ स्मार्ट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागात कॅम्प आयोजित केले जाणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.

या सभेला पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य, सचिव म्हणून गटविकास अधिकारी, जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) आणि सर्व विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. सभेचे कामकाज कक्ष अधिकारी व अधीक्षक यांनी पाहिले.

Leave a Comment

error: Content is protected !!