अंगारकी संकष्टीचा मंगल प्रवास  गारगोटी व मुरगुडातून तब्बल १० बसेस थेट गणपतीपुळ्याला

अंगारकी संकष्टीला प्रवाशानां थेट प्रवासाची सोय

मुरगुड ( शशी दरेकर )

       नवीन वर्षाची सुरुवात गणरायाच्या चरणस्पर्शाने व्हावी म्हणुन मुरगुड व गारगोटी पंचक्रोशीतील हजारो भाविक एसटीच्या लाल परीने थेट गणपतीपुळे येथे जात आहेत. त्यासाठी मुरगुड येथून ७ तर गारगोटी येथून ३ एसटी बसेस आरक्षित झाल्या आहेत.
        
      नवीन वर्षाची सुरुवात भक्तिभावाने आणि सुखकर प्रवासाने व्हावी यासाठी एसटी महामंडळाने भाविकांसाठी एक आनंददायी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या रविवारी ४ जानेवारी व मंगळवारी, ६ जानेवारी रोजी  अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जाणाऱ्या भाविकांसाठी गारगोटी व मुरगुड बसस्थानकातून थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
ही विशेष बससेवा भाविकांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणासाठी व ग्रुप बुकींग साठी उपलब्ध करण्यात आली होती. या बस सेवेसाठी शासनाच्या धोरणानुसार महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आल्या आहेत.

   सदर बसेस रविवारी व मंगळवारी सकाळी  गारगोटीहून आणि मुरगुडहून रवाना होत आहेत. या बस कोल्हापूर, मलकापूर, निवळी फाटा मार्गे दुपारी १ वाजता गणपतीपुळे येथे पोहोचतील. दर्शनानंतर परतीच्या प्रवासासाठी भाविक – प्रवाशांच्या सोयीनुसार बस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता गणपतीपुळ्याहून निघून रात्री १० वाजता गारगोटी व मुरगुड येथे परत येईल.
     ज्या भाविकांनी  अजुनही आरक्षण केले नसेल त्यांनी आपल्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी MSRTC Bus Reservation ॲप किंवा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
भक्ती, सुविधा आणि सुरक्षिततेचा संगम असलेली ही लालपरी सेवा भाविकांच्या अंगी आनंद आणि मनात समाधान निर्माण करणारी ठरणार आहे. असा विश्वास गारगोटी आगार व्यवस्थापक अनिकेत चौगले यांनी व्यक्त केला आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!