पिंपळगाव खुर्द :
कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील एका ३० वर्षीय तरुणाने शेतातील पाण्याच्या मोटारीच्या पेटीला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. अक्षय सुभाष नवाळे असे या मृत तरुणाचे नाव असून, ही घटना रविवारी (दि. २८) दुपारी दोनच्या सुमारास चांभारकी नावाच्या शिवारात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नवाळे याने गावातील रावसाहेब सातपुते यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या मोटारीच्या लोखंडी अँगलला वैराणीच्या दोरीने गळफास घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच त्याला तातडीने बेशुद्ध अवस्थेत कागल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अक्षयला तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अक्षयने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कागल पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.
पिंपळगाव खुर्द येथे तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; कागल पोलिसांत नोंद
Advertisements
AD1