सिद्धनेर्ली : यंदा हिवाळ्यातील पोषक हवामान आणि गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत सध्या ज्वारीचे पीक जोमात आले असून, माळरानावर हिरवीगार पिके डोलताना दिसत आहेत. यंदा थंडीचे प्रमाण पिकाला हवे तसे लाभल्याने ज्वारीच्या दाण्यांचा टपोरेपणा आणि कडब्याची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होनार असून, सर्वत्र पिकाची स्थिती उत्तम आहे.
विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात यंदा ज्वारीच्या क्षेत्रात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. तालुक्यातील दूधगंगा नद्यांच्या काठच्या परिसरासह डोंगराळ भागातील माळरानातही ज्वारीचे पीक डौलाने उभे आहे.तालुक्यातील कसदार जमीन आणि सध्याचा कडाक्याचा गारवा यामुळे पिकाची उंची आणि कणसांचा आकार सुधारला जात आहे. तालुक्यातील पिंपळगाव खुर्द, सिद्धनेर्ली, एकोडी, कापशी यांसारख्या पट्ट्यात ज्वारीची वाढ जोमाने झाली असून, यंदा कडब्याचा चारा मुबलक मिळणार असल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, ज्वारी हे मुळात थंड हवेत चांगले येणारे पीक आहे, त्यामुळे सध्याची थंडी या पिकासाठी ‘टॉनिक’ ठरत आहे. थंडीमुळे पिकाची वाढ जोमाने होत असून कणसामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुरळीत सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, हवामानातील या अनुकूल बदलामुळे ज्वारीवर पडणाऱ्या लष्करी अळी किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कीड-रोगांचे संकट टळल्याने पिकाचा दर्जा उंचावला असून पिके निरोगी दिसत आहेत.
पिकाची ही समाधानकारक स्थिती पाहता यंदा उत्पादनात किमान २० ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ज्वारीच्या विक्रमी उत्पादनासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा म्हणजेच कडब्याचा प्रश्नही कायमचा सुटणार आहे. दर्जेदार पिकाला बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे जास्त पडणार आहेत. एकंदरीतच, निसर्गाची साथ लाभल्याने यंदाचा रब्बी हंगाम कागल तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुगीचा ठरणार आहे.