मुरगूड ( शशी दरेकर )
येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर अखेरच्या आठ महिन्यात विविध सेवा देण्यात आल्या. त्यापैकी नोव्हेंबर २०२५ अखेर सिझेरियनद्वारे ६० प्रसूती (बाळंतपण) सह २४९ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कांबळे यांनी बोलताना दिली.
फेब्रुवारी २०२५ पासून येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली असून या योजनेअंतर्गत १ एप्रिल ते आज अखेर दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या ३५ शस्त्रक्रिया तसेच हर्नियाच्या ४९ आणि दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स शस्त्रक्रिया १४ करण्यात आल्या. ६ रुग्णांना रक्त संक्रमण सेवा (रक्त चढवणे) देण्यात आली.
योजनेअंतर्गत १०४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात सरासरी दैनंदिन २३० ते २५० बाह्य रुग्ण तपासणी होते. तर दरमहा २८० ते ३०० रुग्णांना अंतर रुग्ण सेवा दिली जाते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील ४२ मुलांच्या योग्य त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हृदयविकार असणाऱ्या २४ मुलांची टूडी इको तपासणी करण्यात आली. ३ तीव्र कुपोषित मुलांना पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. रुग्णालयामध्ये आज अखेर १४८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रुग्णालयामध्ये सरासरी ८५० ते ९०० रुग्णांची “क्ष” किरण तपासणी करण्यात आली आहे. प्रयोगशाळा विभागामध्ये दरमहा ४००० ते ४५०० रक्त, लघवी, शौच तपासण्या केल्या जातात. ट्रूनॅट मशीनद्वारे दरमहा ३५० थूंकी नमुने तपासले जातात तर रुग्णालयामार्फत ३५३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करवून घेण्यात आलेल्या आहेत.
या रुग्णालया मार्फत बाहेरून हृदयरोग तज्ञ बोलावून २२ रुग्णांची टूडी इको तपासणी करून घेऊन ६ रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली. रुग्णालयामध्ये लिंक ए आर टी( एच आय व्ही बाधित रुग्णांसाठी) सेंटर कार्यान्वित असून सदर रुग्णांना औषधोपचार दिला जातो अशीही माहिती यावेळी डॉ. कांबळे यांनी दिली.
मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कामाचा लेखाजोखा : आठ महिन्यात ६० सिझेरियनसह २४९ मोठ्या शस्त्रक्रिया
Advertisements
AD1