‘जनतेचा विश्वास हीच मोठी पुंजी’ – परमात्मराज महाराज

परमाब्धि स्वप्न दाखवीत नाही, तर तुम्ही जे स्वप्न बघत असता ते स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करण्यास सुचवितो. तो भाविकांच्या  मनात आनंदी विचारांची सभा भरवतो आणि विषादाला दूर करतो. सर्व मानवांचे चांगले व्हावे असे चिंतन करतो, हा परमाब्धिचा स्वभाव आहे. म्हणून पूर्ण विश्वासाने परमाब्धिचा स्वीकार केल्यास निश्चितच कल्याण होईल, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने आयोजित परमाब्धिविचार महोत्सवाच्या आठव्या दिवशीच्या प्रवचनात बोलत होते.

Advertisements


     यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. यानंतर नामजप, भजन आणि गुरुचरित्र पारायणात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित परमाब्धि विचार प्रवचनात ‘परमाब्धिचा स्वभाव’  याविषयी बोलतांना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले; इथे होणारे विकास कार्य सर्वसामान्य माणसांच्या भक्तीच्या जीवावर चालू आहे. जनतेचा विश्वास हीच मोठी पुंजी आहे. परमाब्धीचा स्वभाव जनतेमध्ये सुधारणा करण्याचा, परिवर्तन करण्याचा आहे. आत्मतत्व हे एकच तत्व आहे, हे समजावून सांगणारा परमाब्धिचा स्वभाव आहे.

Advertisements


     नदी आडव्या येणाऱ्या डोंगराला दूर हो म्हणत नाही. ती बाजूने निघून पुढे जाते. नदीला समुद्राला जाऊन मिळण्याचे ध्येय असते. नदीला काही वेळेला उंचावरून खाली उडी घ्यावी लागते. ते नदीसाठी संकट असले तरी मानवाला त्याचा लाभ होतो. नदीच्या धबधब्याच्या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प राबविले जाऊ शकत असतात. त्याप्रमाणे माणसाच्या जीवनात येणारी संकटे ही काही वेळेला फायद्याची ठरत असतात. पुढे जाणे हे नदीचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. संप्रदाय रूपी नद्यांना परमाब्धिने आपल्यात सामावून घेतले आहे. एकच समुद्ररूपी धर्म आहे. हजारो संप्रदायरूपी नद्यांचे गंतव्य स्थान समुद्रच आहे. एके ठिकाणी जादूगार आला होता. त्याने जादूचा आरसा आणलेला होता. त्यामध्ये माणसाला स्वतःचे वाईट गुण 10 पट जास्त दिसत होते. तो पाहण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. त्याने दुसरा एक आरसा आणला होता. त्यामध्ये शेजाऱ्यांचे वाईट गुण दहापट दिसतात असे सांगितल्यावर पाहणाऱ्यांची गर्दी झाली. यावरून लक्षात येते की लोकांना स्वतःचे दोष झाकण्यास व दुसऱ्याचे दोष उघड करण्यास आवडते. अशी ही बजबजपुरी आहे. मात्र परमाब्धितील आरसे जे सत्य आहे तेच दाखवितात. सत्य दर्शन घडविणारे अनेक आरसे त्यामध्ये आहेत, हा त्याचा स्वभाव आहे. असा हा परमाब्धीचा स्वभाव जाणून घेऊन मनुष्यांनी आपल्या स्वभावात परिवर्तन घडवून आणावे‌. आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनातील स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी योग्य दिशा दाखविण्यारा परमाब्धि आहे. दोष दुसऱ्यावर ढकलणे हा कोणत्याही माणसाचा स्वभाव आहे. परंतु परमाब्धि हा मनुष्यांना सांगतो की दोष, उणीवा दुसऱ्यांवर ढकलू नका. परमाब्धिची भाषा ही मोजक्या शब्दांमध्ये मत मांडणारी भाषा आहे. सूत्रबद्धता हा परमाब्धिचा स्वभाव आहे. कादंबरीमध्ये प्रायः एखाद्या कल्पनेचा विस्तार दिलेला असतो. मात्र परमाब्धि मध्ये सूत्रबद्ध शब्दांद्वारे जे सत्य आहे तेच मोजक्या शब्दात मांडले आहे.

Advertisements


वेद ,उपनिषदे इत्यादी  सर्वांचा सारांश परमाब्धित आहे. मतभेद सोडून आवश्यक सत्यज्ञान परमाब्धिमध्ये आणि आपल्या अन्य ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे दंगल होण्याचा संभवच नाही. सर्वांसाठी हितावह हे वाङ्मय आहे. सर्वांना मिसळून घेणारा स्वभाव या ग्रंथाचा आहे. जोपर्यंत आत्मतत्त्व आहे तोपर्यंत शरीराला किंमत आहे. आत्म स्वभावाचे महत्त्व आहे. आपण कोण आहोत हे जाणून घ्यावे. माणसाने आत्म भावात रममाण राहावे. परमाब्धि आणि आपले अन्य वाङ्मय  यातील ज्ञान खुले आहे. अध्यात्म समजून घेण्यासाठी परमाब्धिवर पूर्ण विश्वास ठेवा, असे सांगितले.


     यावेळी भजन विभा आणि भजन संध्या कार्यक्रमात श्री हनुमान सेवा भजनी मंडळ करनूर, श्री विठ्ठल भजनी मंडळ पडलीहाळ तसेच पल्लवी शिंदे हंचिनाळ, अजित शिंदे गळतगा, श्री म्हाळुंगे भिवशी, तबला साथ रोहण कुंभार भोज यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी हाल शुगरचे चेअरमन एम पी पाटील, उद्योगपती देवाशीष नायक ओरिसा, सुखदेव साळुंखे कोल्हापूर, धैर्यशील पाटील भुयेकर, डॉ. सतीश लवटे इचलकरंजी, सचिन खोत कोगनोळी, शशिकांत पाटील खनदाळ आदी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!