मुरगूड ( शशी दरेकर ):
कागल तालुका लोककल्याण समता प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गोरंबे येथे नुकतेच नवनिर्वाचित सरपंच आयुष्यमती आशाराणी निशिकांत कांबळे यांचा भव्य सत्कार सोहळा स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजहित, गावविकासाची बांधिलकी आणि तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आशाराणी ताईंना शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन यथोचित गौरव केला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी केले. त्यांनी बोलताना आशाराणी ताईंच्या सरपंच पदी झालेल्या निवडीचे कौतुक करून, त्यांच्या नेतृत्वाखाली गोरंबे गावाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला. “गावच्या हितासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सामाजिक समतेसाठी नवे नेतृत्व उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोककल्याण समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य एच. जी. कांबळे सर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना त्यांनी सरपंच पदाचे महत्व, जबाबदाऱ्या आणि गावकऱ्यांच्या अपेक्षा यांचा उल्लेख करत आशाराणी ताईंच्या कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
“गावाचा विकास, पायाभूत सुविधा, सामाजिक एकात्मता आणि शैक्षणिक उन्नती यांना प्राधान्य देणारे नेतृत्वच बदल घडवते,” असे त्यांनी म्हटले.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख कार्यकर्ते महेश धम्मरक्षित सर, आयु. हिरामणी कांबळे सर (नंद्याळ), प्रा. अशोक कांबळे मळगेकर, प्रा. एकनाथ चौगुले सर आणि एच. जी. कांबळे सर यांनीही गावाच्या प्रगतीसाठी विधायक सूचना देऊन नवनिर्वाचित सरपंच आशाराणी कांबळे यांचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांनी गावातील समस्यांचे समाधान, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, युवकांच्या सहभागाचे महत्व आणि समाजातील ऐक्य यावरही मुद्देसूद विचार मांडले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन किरण चौगुले यांनी केले.
त्यांनी सर्व उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानून, “गोरंबे ग्रामपंचायतीने निवडलेल्या नव्या नेतृत्वामुळे गाव विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी नागेश कांबळे (व्हनाळी), नामदेव कांबळे (केनवडे), निवास कांबळे (सांगाव), विकी कांबळे, अमोल कांबळे (कौलगे), अजय कांबळे (नंद्याळकर), निल कांबळे (कौलगे), विकी कांबळे (यमगर्णी), प्रकाश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सोशल मीडिया जिल्हा संघटक सतीश कांबळे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच “आशाराणी कांबळे” यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
Advertisements
AD1