मुरगूड ( शशी दरेकर ):
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत कोल्हापूर विभागीय हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले . या संघाची कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी येथे होणाऱ्या आंतरविभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
विवेकानंद कॉलेज येथे झालेल्या या स्पर्धेत १६ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या संघाने स्पर्धेत भारती विद्यापीठ संघाला २५ – ४, २५ – १२, डी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज,कोल्हापूरला २५ -१८, २५ -१३ तर उंपात्य फेरीत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरचा २५ -१८, २५ – २३ या गुण फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत आण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले यांच्या बरोबर झालेल्या अटीतटीच्या लढतीत मंडलिक महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मंडलिक महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघातील खेळाडू असे : गजानन गोधडे (कर्णधार), ओंकार लोकरे, सागर संकपाळ, करण मांगले, विवेक चौगले, नंदकिशोर चौगले, रवींद्र हळदकर, सत्यजित शिंदे, अभिजीत रामाने, बुद्धीराज माने, विश्वजीत रामाने, निखिल सावंत.
या खेळाडूंचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वागत व प्रस्ताविक उप-प्राचार्य व संघ व्यवस्थापक प्रा.डॉ. शिवाजी पोवार यांनी केले. स्पर्धेविषयीचा वृत्तांत मार्गदर्शक महादेव कानकेकर यांनी मांडला. तर आभार प्रा. सरदेसाई यांनी मानले.
या संघाला मार्गदर्शक महादेव कानकेकर, संघ व्यवस्थापक व उप-प्राचार्य प्रा.डॉ.शिवाजी पोवार, संभाजी मांगले, श्रावण कळांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. तर मा.खास. प्रा. संजय मंडलिक, कार्याध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक, संस्था अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, कार्यवाह अण्णासो थोरवत, प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे यांचे प्रोत्साहन लाभले.