पक्षकारांच्या पाठपुराव्याला यश ! प्रलंबित प्रकरणांना मिळणार न्याय !
मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील व मुरगूड परिसरातील ५४ गावांच्या कार्यक्षेत्रासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे फौजदारी व दिवाणी न्यायालय मुरगूडमध्ये लवकरच सुरु होणार आहे यासंबंधी प्रशासकिय हालचालींना वेग आला आहे.
तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण टोकावरून कागल न्यायालयाकडे हजारो पक्षकारांना धाव घ्यावी लागत होती. त्यात या पक्षकारांचा वेळ व पैसा फुकट जात होता. अनेक प्रकरणे दीर्घकाळपर्यंत प्रलंबित रहात होती याचा नाहक त्रास पक्षकारांना सहन करावा लागत होता. पक्षकारांची गरज व खटल्यांना योग्यवेळी न्याय मिळण्यासाठी मुरगूडला फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरु व्हावे अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. या भागातील ग्रामपंचायतीसह अनेक संस्थांनी ठरावाद्वारे राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे मागणीचा पाठपुरावा सुरु ठेवला होता याला आता विधी व न्याय विभागाबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाने (हायकोर्ट ) सम्मती दिली आहे.

मुरगूड शहराला संलग्न अशी तीस गावे आहेत शिवाय कागल पासून कापशी खोऱ्यातील व भुदरगड तालुका सीमारेषेवरील वीस ते पंचवीस गावांच्या पक्षकारांना तालुक्याच्या ठिकाणी न्यायासाठी कागलला जाणे म्हणजे दिव्य होते. आपल्या प्रकरणावरील सुनावणीसाठी त्यांना पन्नास ते साठ किलोमीटर अंतराचा प्रवास करताना दिवसभरचा वेळ व पैसा खर्च करावा लागत होता. त्याचा नाहक त्रासही पक्षकारांना होत होता. आता या नव्याने सुरु होणाऱ्या न्यायालयाने या भागातील पक्षकारांनाही या न्यायालयाने न्याय मिळणार आहे.
न्यायालय लवकरच सुरु करण्याच्या प्रशासकिय हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी हुतात्मा तुकाराम चौकातील मुरगूड नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स इमारतीचा वरील विस्तारीत भाग निश्चित करण्यात आला आहे. त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे. त्या संबंधीच्या अहवालास राज्यसरकारच्या वित्त भागाकडून मंजूरी मिळताच न्यायालय सुरु होण्याला मूर्त स्वरूप येईल.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर असे फौजदारी व दिवाणी अशा दोन वर्गात न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. या न्यायालयामुळे दोन न्यायाधीशासह २० ते २५ वकिलांची फौज सरकारी वकीलसह प्रशासकिय सेवक वर्ग यांचा या न्यायालयीन न्याय प्रक्रियेत समावेश असणार आहे व त्यावर आधारित इतर व्यावसायिक कामांना वाव मिळेल. या नव्या न्यायालयाने या भागातील विशेषतः मुरगूड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ५४ गावच्या पक्षकारांच्या फौजदारी व दिवाणी प्रलंबित खटल्यांना लवकर न्याय मिळेल व त्यासाठीची होणारी गैरसोयही दूर होईल.
पक्षकारांचे स्वप्न पूर्ण !
तालुक्याचे ठिकाण एका बाजूला तर तालुक्यातील गावांचे टोक दूरच्या अंतरावर त्यामुळे पक्षकारांना न्यायालयात जा-ये करताना आटापीटा करावा लागत होता. त्यांना आता शासनाच्या न्याय आपल्या दारी या सूत्रानुसार न्याय सुलभ व कमी वेळेत मिळणे शक्य होणार आहे. अनेक दिवसापासून येथे न्यायालय सुरु होण्याचा पाठपुरावा सुरु होता त्याला अखेर यश आले. – ॲड .जीवन शिंदे