कागल / प्रतिनिधी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे. कर्नाटक _महाराष्ट्र सिमेवर एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. कर्नाटकात वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, सेना नेते संजय पवार हे शनिवारी सकाळी दहा वाजता कर्नाटकात जात होते. त्यांना महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी रोखून धरले.
देवणे व पवार यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना कागल पोलिसांनी घेतले व नंतर सोडून दिले. दरम्यान देवणे व पवार यांनी कर्नाटक सरकारचा धिक्कार केला. मराठी भाषिकांचा आवाज दाबला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली .सीमेवर पोलीस व आंदोलन यांच्यात झटापट झाली .जोरदार घोषणाबाजी झाली.

एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांचा काळा दिन म्हणून साजरा करतात. मराठा मंदिर येथील सभेस पाठिंबा देण्यासाठी व तेथे उपस्थित राहण्यासाठी सेनेचे पदाधिकारी बेळगावला जात होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विजय देवणे म्हणाले, एक नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी मराठी भाषिक गेली अनेक वर्षे रॅली काढतात .या रॅलीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व मराठी भाषिकांचा भव्य मेळावा मराठा मंदिर येथे होत आहे. तेथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मला निमंत्रण होते. यासाठी त्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने जात होतो. कर्नाटक सरकारचे महाराष्ट्रा बद्दलचे पुतना मावशीचे प्रेम यावेळी दिसून आले.
मराठी माणसाला चारही बाजूने परवानगी द्यावयाची नाही असे कर्नाटकातील बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचे धोरण असते. महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून बेळगावकडे निघालो असता महाराष्ट्र कर्नाटक सरहद्दीवर मला अडविले असले तरी , महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा आवाज दाबला जाणार नाही. मात्र कर्नाटक जेवढी दडपशाही करेल तेवढा लढा तीव्र होतो .गेल्या अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे .आजच्या या दडपशाहीचा मी उबाठा व मराठी बांधवांच्या वतीने तिव्र निषेध करतो असे ते म्हणाले.
ही घटना घडत असताना महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .देवणे यांना परत पाठवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. विजय देवणे हे कर्नाटकात जाऊ नयेत ,यासाठी कर्नाटकाचे पोलीस महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करीत होते.
मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, उपनिरीक्षक रमेश पवार, , पोलीस कॉन्स्टेबल शिवप्रसाद के यांच्यासह सुमारे पन्नास पोलिसांचा ताफा तसेच कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे,पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांच्यासह मोठा फौजाफाटा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीमा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखून धरले. घोषणाबाजी करत या सर्वांना पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.