कागल : कार्तिकी एकादशीच्या पावन निमित्ताने सदाशिव जाधव फाउंडेशन, कागल यांच्या वतीने रविवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी शाहू कॉलनी येथे भव्य भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून होणाऱ्या या कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्तिकी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. पांडुरंग भक्तीचा प्रकाश आणि संत मार्गाच्या शिकवणींचा संदेश प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविण्याचा हेतू या कार्यक्रमामागे आहे, असे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

या भक्तिमय सोहळ्यात ह.भ.प. प्राध्यापिका सौ. विजयाताई संजय अडसूळ यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, त्यांच्या आवाजातील ओज, माधुर्य आणि भावस्पर्शी विवेचन भाविकांच्या मनाला अध्यात्माची नवी ऊर्जा प्रदान करणार आहे. कीर्तनासोबत भजनांचा गजर, हरिनामाचे माहात्म्य आणि अध्यात्म, संस्कार व सामूहिक भक्तीचा आनंद यांचा अद्वितीय संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन सदाशिवराव जाधव गुरुजी फाउंडेशन, कागल यांच्या वतीने करण्यात आले असून, साईप्रसाद संजय जाधव हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. भाविक, स्त्री-पुरुष, युवक-युवती आणि कुटुंबीयांनी सहभागी होऊन भक्तीमय वातावरणाने शाहू कॉलनी दुमदुमवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.