बेलवळे बुद्रुक येथे गोकुळ चा दुध उत्पादक शेतकरी मेळावा
व्हनाळी(वार्ताहर): बेलवळे बुद्रुक येथील दुध उत्पादक हे नेहमीच उत्तम प्रतीचे दूध गोकुळ दुध सघाकडे पाठवत आहे. त्याकरिता सर्व दूध उत्पादक, चेअरमन, संचालक, सचिव व कामगार या सर्वांचे फार कष्ट आहेत. दूध उत्पादन क्षमतेत जो बदल झाला, हा बदल अचानक झालेला नाही. त्यासाठी बरेच दिवस लागले आहेत. भविष्यात बेलवळे बुद्रुक च्या दुग्ध व्यवसायाचे अनुकरण संपूर्ण जिल्ह्याला घेण्यासारखे आहे. बेलवळे बुद्रुक हे गाव पहिल्यापासूनच दुग्ध व्यवसायात अग्रेसर गाव म्हणून नावलौकिक असे गाव असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक अबंरीषसिंह घाटगे यांनी केले.
बेलवळे बुद्रुक ता.कागल येथे दत्त सह.दुध संस्था व गोकुळ दुध संघ यांच्यावतीने आयोजित दुध उत्पादकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख उपस्थीत गोकुळचे संचालक अरुण डोंगळे होते.
गोकुळचे संचालक अरुण डोंगळे म्हणाले की बेलवळे बुद्रुक दूध उत्पादकांच्या कडून घेण्यासारखे खूप काही आहे, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, तसेच शेतीला जोड धंदा म्हणून ग्रामिण भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. दुग्ध व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय वाढवावा यासाठी गोकुळ दुध संघ विविध योजना राबवत आहे. त्याचा उत्पादकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गोकुळ चे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश गोडबोले यांनी दूध व्यवसायातील अडचणी, दुग्ध व्यवसाय वाढीसाठी करावयाचे उपाय यांचे मार्गदर्शन करून दुग्ध व्यवसायाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास महादेव पाटील होते.
कार्यक्रमास सहाय्यक व्यवस्थापक सुभाष जामदार, शरद तुरंबेकर व सहाय्यक दूध संकलन अधिकारी चंद्रशेखर घाळी माजी सरपंच नारायण पाटील, संजय पाटील, सखाराम पाटील, दत्तात्रय सावेकर, आनंदा कदम, बाळासो हरी पाटील, कृष्णात पाटील, पी. बी.पाटील, बाबुराव शिंदे,आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. स्वागत शामराव पाटील यांनी तर आभार पांडुरंग पाटील यांनी मानले.
विरोधात संचालक होण्याची घाटगेंची परंपरा कायम….
गोकुळ दुध संघाच्या निवडणूकीत नेहमीच विरोधी पॅनेलमधून निवडून येण्याची अंबरिषसिंह घाटगे यांची परंपरा आजही कायम आहे त्याबद्दल त्यांचे मनपुर्वक स्वागत असे गौरवउदगार मनोगतात गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी काढताच उपस्थितांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली.