श्री रासाई देवी मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहन व वास्तुशांती सोहळा उत्साहात
गडहिंग्लज, दि. ६: गडहिंग्लज ता.गडहिंग्लज शहरातील लाखे नगरातील डोंबारी समाजाच्या खापरीच्या घरांच्या जागी आरसीसी घरे देऊ, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. डोंबारी वसाहतीने बांधलेल्या श्री रासाई देवी मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यात मंत्री श्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दिवसभरात श्री रासाई देवीची मूर्ती प्रतिष्ठापना, मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला.
मंत्री मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, आमचे नेते स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी भटक्या असलेल्या या समाजाच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न सोडविला होता. त्या जागेवर आज तुमची खापरीची घरी आहेत लवकरच तुम्हाला पक्की आरसीसी घरे बांधून देऊ. जागा उपलब्ध झाल्यास या समाजासाठी सांस्कृतिक सभागृहही बांधून देऊ, असे श्री. मुश्रीफ म्हणाले.
प्रास्ताविकपर भाषणात उदयराव जोशी म्हणाले, भटक्या असलेल्या डोंबारी समाजाच्या पाठीशी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ सातत्याने पहाडासारखे उभे राहिलेले आहेत. या समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
नगरसेवक दीपक कुराडे म्हणाले स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, उदयराव जोशी यांच्यापाठोपाठ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची या समाजाने नेहमीच पाठराखण केली आहे. मंत्री मुश्रीफ यांनीही या समाजाला आपलेपणाने जवळ घेतले आहे.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, प्रा. किसनराव कुराडे सोनाप्पा लाखे, विलास लाखे, किरण लाखे, शिवाजी लाखे, रामा लाखे, राजु लाखे,अशोक लाखे, किरण लाखे, संदीप लाखे आदी प्रमुख उपस्थित होते.