मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत असलेले येथील विनायक शशीकांत पाटील यांनी राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबला ५ हजार किंमतीचे व्हॉलीबॉल प्रदान केले आहेत. यावेळी व्हॉलीबॉल प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर म्हणाले, राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लब गेली २५ वर्षे कार्यरत आहे. क्लबच्या माध्यमातून विविध वयोगटातून मुलांच्या व मुलींच्या संघानी प्रत्येकी चारवेळा राज्यस्तरीय स्पर्धेत क्रमांक पटकावले आहेत.
आतापर्यंत ४० खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहेत. आताही शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा १९ वर्षाखालील मुलांचा व्हॉलीबॉल संघ विभागीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विनायक पाटील यांनी मुरगूडला व्हॉलीबॉल खेळाची गौरवशाली परंपरा असून यापुढेही हा नावलौकिक कायम रहावा यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तसेच विभागीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १९ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघास शुभेच्छा दिल्या. यावेळी गजानन गोधडे, किर्तीराज पाटील, श्रावण कळांद्रे, सुशांत भाट, निखील पाटील, करण मांगले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. स्वागत गजानन गोधडे यांनी केले. तर आभार अमित साळोखे यांनी मानले.