मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मधील नाका नंबर १ ते सर पिराजी तलावा पर्यंत चा मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून येथील मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
हा रस्ता मोठ्या रहदारीचा असून याच रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय ,नगरपरिषद , एस टी बस स्थानक, शिवतीर्थ , तुकाराम चौक हुतात्मा स्मारक, मुरगूड विद्यालय,शिवराज विद्यालय इत्यादी स्थळे आहेत. त्यामुळे हा रस्ता प्रचंड रहदारीचा आहे.एस टी बस, कार, दूध व ऊस वाहतुकीची वाहने, ट्रॅक्टर्स,या वाहनांसह सर्व दुचाकी वाहने याच रस्त्यावरून जातात. शाळांमुळे विद्यार्थी वर्दळ तर खूपच असते.

हा रस्ता कित्येक दिवस दुर्लक्षित आहे. याचे कारण तो नगरपरिषदेच्या देखभाली खाली येत नाही.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत.कांहीं खड्डे इतके मोठे की त्यात मध्यंतरी शिव भक्तांनी पोतदार यांचे हस्ते वृक्षारोपण केले होते.अशा वेळी तात्पुरते खड्डे भरण्याचे काम नगरपरिषदेला करावे लागते.या रस्त्याचे दर्जेदार स्वरूपाचे काम झाले पाहिजे कारण हा मुख्य रस्ता पुढे कापशी व गडहिंग्लज ला जातो.शिवाय शहरातून जाणारा हा रस्ता शहराचे वैभव वाढवतो.
या सर्व मुख्य गोष्टी लक्षात घेऊन मुरगूड येथील मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तुकाराम चौकात धरणे धरले. या रस्ते विभागाचे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित चोरे, मॅनेजर अनिल पाटील, सुपरवायझर विजय चौगुले,या अधिकाऱ्यांना भेटून कार्यकर्त्यांनी जाब विचारला आणि रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे अशी मागणी केली.संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा काम व्यवस्थित ,वेळेत व दर्जेदार करण्याची हमी दिली आहे.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक बाजीराव गोधडे, शिवाजी चौगुले, दत्तात्रेय मंडलिक, विक्रम गोधडे, किरण गवाणकर, सुहास खराडे ,यांच्यासह राजेंद्र कांबळे, सचिन भारमल, संभाजी आंगज, अक्षय शिंदे, नेताजी कळांद्रे, शशिकांत पाटील, विनायक मुसळे, समीर हळदकर, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे यांचा सहभाग होता.