मुरगूड (शशी दरेकर) : विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून पद,पैसा आणि प्रतिष्ठा मिळविण्या बरोबरच प्रत्येकाने सामाजिकतेचे भान ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांनी केले. ते शहीद साताप्पा महादेव पाटील विद्यालय बेलेवाडी मासाच्या सन २०११-१२ च्या इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस् आय घाळी होते. सुनील इंगवले,रंगराव भराडे, बाबासाहेब कमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम येथील विद्यामंदिर बेलेवाडी मासा (ता.कागल)च्या सभागृहामध्ये संपन्न झाला.

अध्यक्षीय भाषणात श्री. घाळी म्हणाले, प्राथमिक शाळेमध्ये आमच्यासमोर असणारे आमचे चिमुकले विद्यार्थी अत्यंत आज्ञाधारक आणि विनम्र असे होते. आज विविध क्षेत्रामध्ये ते चमकताना पाहून त्यांचा खूप अभिमान वाटतो.

श्री सुनील इंगवले म्हणाले, प्रत्येकाने आपल्या करिअरमध्ये नेहमी क्रियाशील राहून पुढीचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. ओळख परेड मधून, विविध क्षेत्रांमध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे करिअर केल्याचे दिसून येत होते. गावातील शेतीमध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते पुण्याच्या आयटी क्षेत्रामध्ये उच्चपदस्थ असणाऱ्या या सर्वच मित्र परिवारामध्ये एकमेकांना भेटल्यानंतर जुन्या आठवणीनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तब्बल एक तपानंतर आपल्या गुरुवर्यांना भेटल्यानंतर सारेच विद्यार्थी नतमस्तक होत होते.
आपल्या मनोगतामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. ” गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ” असेच बोल त्यांच्या तोंडून बाहेर पडत होते.
अजय पाटील, अमोल घाळी, विशाल माने, अमित शिंत्रे, सुहास डावरे, प्रज्ञा पाटील, शामल तांबेकर आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
कार्यक्रमाचे स्वागत स्मिता गुडाळे यांनी, प्रास्ताविक सुहास डावरे यांनी, सूत्रसंचालन स्वप्नाली पाटील, यांनी तर आभार दत्तात्रय आदमापुरे यांनी मानले.