लाडकी बहीण योजनेची मंजुरीपत्रे व बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप
सिद्धनेर्ली : गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत माता-भगिनींनी अनंत आशीर्वाद दिले आणि प्रेम केले. माता-भगिनींच्या या आशीर्वाद आणि प्रेमावर जीव ओवाळून टाकावा तितका कमीच आहे, अशी कृतज्ञता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. या पुण्याईच्या कवचकुंडलामुळेच आजवरच्या वाटचालीत यशस्वी झालो आणि सुरक्षित राहिलो, असेही ते म्हणाले.
सिध्दनेर्ली ता. कागल येथे मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची मंजुरीपत्रे आणि बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, जनतेने दिलेल्या संधीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजनेच्या माध्यमातून कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या आहेत. येत्या रक्षाबंधनापर्यन्त लाडक्या बहिनींना रक्षाबंधन भेट देणार आहे. तसेच; शेतमजूर, ड्रायव्हर यांच्यासाठी महामंडळ स्थापन करणारच, असेही ते म्हणाले. आज पर्यंत गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबिविल्या आहेत.यापुढे ही अश्या अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांचे कल्याण करण्याची संधी द्यावी. जलजीवनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गावातील कामाची स्तुतीही ह्यावेळी त्यांनी केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रताप उर्फ भया माने म्हणाले, हसनसाहेब मुश्रीफ यांच्यासारखा सुख -दुःखात सहभागी होणारा आमदार आपल्याला मिळाला आहे हे आमचे भाग्य आहे. काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. नक्कल आणि स्टंटबाजी करून आमदार होता येत नाही.
सरपंच दत्तात्रय पाटील म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफसाहेबांनी आज पर्यन्त केलेल्या विकास कामाचा आणि जनतेसाठी विविध योजनेच्या माध्यमातून केलेला विकास हा फार मोठा आहे. लाडकी बहीण योजनेचा माध्यमातून चालू केलेलं महिलांच्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून येत्या निवडणूकीत त्यांच्या विजयाच्या शिल्पकार ह्या महिलाच असणार आहेत.
कार्यक्रमाला सरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच कृष्णात मेटील, उपसरपंच सौ. वनिता घराळ, मनोहर लोहार, विजय कुरणे, राजू गुरव, तानाजी पाटील, संदीप पाटील, सुभाष मगदूम, विलास पोवार, सागर माने, सौरभ साठे, सौ. वर्षा आगळे, सौ. रेखा मगदूम, सौ. कुसुम मेटील आदी प्रमुखांसह ग्रामस्थ विशेषत: माता -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वागत ग्रामपंचायत सदस्या सौ. रत्नप्रभा गुरव यांनी केले. प्रास्ताविक सरपंच दत्ता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार युवराज खदरे यांनी मानले.
भरदुपारी भरपावसात……! या कार्यक्रमाची वेळ होती दुपारी तीनची. भरदुपारी आणि मुसळधार भरपावसातही गावातील उपस्थित माता-भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. एवढ्या मुसळधार पावसातही कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल श्री. मुश्रीफ यांनी माता-भगिनींचे ऋण व्यक्त केले.