कोल्हापूर : श्री दुर्गासप्तशती अंतर्गत श्री ब्रह्मदेव आणि श्री मार्कडेयऋषी यांच्या मधील संवादाप्रमाणे सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ असे जे देवी कवच आहे, त्यानुसार देवी नऊ नांवांनी प्रसिद्ध आहे. ही नऊ नांवे म्हणजेच नवदुर्गा. ह्या नवदुर्गा अनुक्रमे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री होत. यांतील दुर्गेच्या आठव्या रूपाचे नाव महागौरी आहे.
महागौरी पूर्णतः गौर वर्णाची आहे. तिच्या वर्णाची तुलना शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांशी करता येईल. ‘अष्टवर्षा भवेद गौरी’ अर्थात तिचे वय आठ वर्षे मानले जाते. तिचे सर्व वस्त्रालंकार श्वेत वर्णाचे आहेत. ती चतुर्भुजा देवी आहे आणि तिचे वाहन वृषभ आहे. तिच्या उजव्या वरच्या हातात अभय मुद्रा, उजव्या खालच्या हातात त्रिशूळ, वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात वरमुद्रा आहे. तिची भावमुद्रा अत्यंत प्रसन्न, शांत आहे.
पार्वतीच्या रूपात तिने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तिने प्रतिज्ञा केली होती की, मी वरदान देणाऱ्या शिवाशीच विवाह करेन, कारण त्याच्याशिवाय दुसरा देव मी मानत नाही. तिच्या कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर पूर्ण काळे पडले. पुढे तिच्या तपश्चर्येने प्रसन्न आणि संतुष्ट झालेल्या शिवाने तिला गंगेचे पवित्र स्नान घडविले, जेणेकरून तिचे शरीर अत्यंत कांतीमान व गौरवर्णाचे झाले. तेंव्हापासून तिचे नांव महागौरी पडले.
तिची शक्ति अमोघ आणि फलदायी आहे. तिच्या उपसानेने भक्तांच्या सर्व पापांचे क्षालन होते. तसेच सर्व पूर्वसंचित पापसुद्धा नष्ट होते. भविष्यात येणारी दुःख- दैन्य, पाप-संताप, कधीच येत नाहीत. तो भक्त सर्व प्रकारे पवित्र आणि अक्षय पुण्यांचा अधिकारी होतो.
श्री महागौरीचे ध्यानस्मरण, आराधना, उपासना भक्तांच्यासाठी सर्वस्वी कल्याणकारी आहे. तिच्या कृपेने अलौकिक सिद्धी प्राप्त होतात. ती भक्तांचे कष्ट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्येसुद्धा शक्य होऊन जातात. पुराणांमध्ये तिचा महिमा खूप वर्णन केलेला आहे. मानवी प्रवृत्तीला वाईटाकडून चांगल्याकडे नेण्यासाठी आपण तिला सदैव शरण गेले पाहिजे.