कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२ या परीक्षेची चाचणी दिलेल्या उमेदवारांना दिनांक १ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. राज्यातील काही भागात इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नसल्यामुळे तसेच दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता ही प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नाही, ही बाब विचारात घेता स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२ या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीस २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी चाचणी दिली आहे.
प्रमाणिकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. त्यास यथाशीघ्र उत्तर देण्यात येईल. यासाठी कोणाही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करु नये. वर नमूद केलेल्या कालावधीत जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – 2022 ही चाचणी दिलेल्या उमेदवारांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन दिनांक 22 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.