शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्यात येईल – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर : अवकाळी व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या भात, सोयाबीन, भुईमुग, नाचणी, ज्वारी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महिनाअखेर शासनाकडे अहवाल सादर करुन शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात अवकाळी व परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथील छत्रपती शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी, जिल्हा नियेाजन विभागाचे श्री. इनामदार, कृषी पर्यवेक्षक संजय सुतार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत आढावा घेवून महिनाअखेर शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या.
कोल्हापूर शहरासह जिल्हाचा पर्यटन विकास, रंकाळा संवर्धन, राधानगरी पर्यटन विकास, लोकराजा शाहू महाराज वारसास्थळे आदी तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशास सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केल्या. याबरोबरच जिल्ह्यातील शाळांची दुरूस्ती, पोलीस विभागाची वाहने व निवासस्थाने, जिल्हयात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.केसरकर यांनी केल्या.