कागल पोलीसाना गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश
कागल(विक्रांत कोरे) : चेन स्नॅचिंग प्रकरणातील कागल पोलीस ठाण्यात अटक असलेल्या तिन आरोपींकडून हिसडा मारून सोन्याचे दागिने लांबविणे या सारखे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. आरोपींच्याकडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्याच्या अलंकारिक दागिन्यांचा समावेश आहे. गुन्हे उघडकीस आणल्याने कागल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रानातील काम आटपून गावाकडे परतत असलेल्या सौ अक्काताई संजय धनगर ,राहणार- करनूर तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर यांचे तोंड दाबून धरून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसडा मारून घेऊन जात असताना ,त्यांना लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. ही घटना तारीख 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करनूर ते रामकृष्ण नगर दरम्यानच्या रस्त्यावर सर्जेराव घाटगे यांच्या घरासमोर घडली होती. आरोपी प्रवीण अशोक नीलगार वय वर्षे 19 ,राहणार गल्ली नंबर सहा- सहारा नगर रुई ,तालुका -हातकणंगले,, शुभम अमित पटेल वय वर्ष 22, गल्ली नंबर 13 सहारा नगर रुई, तालुका- हातकणंगले व विधी संघर्ष ग्रस्त बालक या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
कागल पोलिसांनी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्याकडून कोठे कोठे चैन स्नॅचिंगचे प्रकार घडले होते. ते त्यांच्याकडून उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश आले. आरोपींच्याकडून बारा ग्रॅम चे सोन्याचे मंगळसूत्र ,किंमत 70 हजार रुपये, 15 ग्रॅम वजनाचे बोरमाळ -किंमत 60 हजार रुपये, 12 ग्रॅम सोन्याचे बोरमाळ- किंमत रुपये 30 हजार, 50 मण्याची मोहन माळ- किंमत रुपये 40 हजार, 39 मण्यांची बोरमाळ- किंमत रुपये 40 हजार, मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन ,ए एम -73 56- किंमत रुपये 60 हजार, स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच 09-8023 किंमत रुपये 95 हजार, असा सुमारे तीन लाख 95 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक खैरमोडे, विजय पाटील, युवराज पाटील, मुनाफ मुल्ला यांनी या प्रकरणाचा सचोटीने तपास केला.