gandhiji
संपादकीय

गांधी इंग्रजांशी लढले माफीचा साक्षीदार झाले नाहीत

काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे तरी काँग्रेसला आमचीच चिंता, काँग्रेस सध्या कोमात आहे असे उदगार उद्गार भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काढले. वृत्तपत्रातून ते सर्व भारतीयांनी वाचले. या  वक्तव्यातून मोदीना आणि भारतीय जनता पक्षाला किती अहंकार निर्माण झाला आहे याची प्रचिती आली. मोदी अनेक वेळा काँग्रेस बद्दल असे बोलले आहेत. भारतीय जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाला केंद्रातील मिळालेल्या राक्षसी बहुमताचा अहंकार निर्माण झाल्याचे त्यांच्या नेत्यांच्या नेहमी भाषणावरून अनेक वेळा निदर्शनात आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी मोदी भारतीय जनता पक्षाचे नेते होते, आता निवडून येऊन पंतप्रधान झाल्यावर ते तमाम भारतीय जनतेचे पंतप्रधान झाले आहेत ते सध्या देशाचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यांना विरोधातील सर्व पक्षांना चांगली आणि आदराची वागणूक द्यावी लागेल. हा भारतीय लोकशाहीचा संकेत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी मिळून या देशाचा कारभार करावयाचा आहे. देशातील लोकांना सुखाचे आणि समाधानाचे जीवन जगता यावे, जागतिक स्पर्धेत भारताची प्रगती जगाला दिसून यावी यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करावयाचे आहेत. सत्तेच्या राजकारणात विरोधी पक्ष प्रबळ असेल तरच देशाचा कारभार लोकाभिमुख होतो. विरोधकांना विश्‍वासात न घेता त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे हे लोकशाहीला धरून नाही. देशाचा कारभार एकतर्फी केल्यास देशात एकाधिकारशाही अगर हुकूमशाही निर्माण होण्याचा धोका असतो. काँग्रेस पक्ष आज सत्तेत नसला तरी या देशाचा मोठा विकास या पक्षाने केला आहे. अनेक वर्ष सत्ता असल्याने देश चालविताना काही चुका झाल्या त्यांना लोकांनी 2014 साली सत्तेपासून दूर ठेवले. भाजपने आमचे प्रचंड बहुमत आहे, आम्हाला कोणीच विरोध करू नये अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना कुचकट व स्वार्थी राजकारण कुणी करू नये कारण ते जनतेला आवडणार नाही. आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीची लसीची गरज असताना परदेशात लस पाठविण्याची चूक केंद्र सरकारने केली आहे. सरकार चुकलेले दिसते अशा वेळी केंद्राकडे बोट दाखवावे लागते. महाराष्ट्रात भिन्न पक्षाचे सरकार आहे म्हणून केंद्राला त्या राज्याशी दुजाभाव करता येणार नाही कारण तो प्रश्‍न लोकांच्या जीवाशी खेळल्यासारखा होईल.

मध्यंतरी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या ‘चलेजाव’ घोषणेमुळे ब्रिटीश गेले नाहीत असे वक्तव्य केले होते. हा देशातील रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचा आणि क्रांतीकारकांचा अपमान आहे. सभापती महाजन ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्यावरून असे वाटते की देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व काँग्रेसच्या महात्मा गांधी यांनी केले हेच या मंडळीना आवडत नसावे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात देशातील सर्वच लोकांनी गांधींना पाठिंबा देऊन त्यांच्या पाठीशी ते त्यांच्या पाठीशी राहिले. गांधीनी लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले. कदाचित महात्मा गांधीजींची अफाट लोकप्रियता या देशातील काही लोकांना डाचत असावी. गांधी निर्भय होते, धाडसाने इंग्रजी सत्तेच्या समोर गेले, ते माफीचे साक्षीदार झाले नाहीत. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही त्यांना गांधींच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. हा देश गांधी-नेहरूंना मानणारा आहे. आजही गांधी नेहरूंची लोकप्रियता टिकून आहे.

भारतीय जनता पक्षाला २०१४ साली केंद्रात सत्ता मिळाली देशातील लोक काँग्रेसमधील भ्रष्टाचार, घराणेशाही या गोष्टींना कंटाळलेले होते. त्यांनी भाजपा पक्षाला सत्तेवर आणले. भारतीय जनता पक्षाने निवडणूक काळात जनतेला अनेक आश्वासने दिली. ती सात वर्षात त्यांना पूर्ण करता आली नाहीत. प्रत्येक नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये देणार, नोटाबंदीतून देशातील काळा पैसा बाहेर काढणार, कोट्यावधी बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणार अशी अनेक आश्वासने दिली. काळा पैसाही बाहेर निघाला नाही आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्या ही देऊ शकले नाही. याउलट देशात तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. गेल्या सात वर्षात केंद्रातील भाजपा सरकारला अनेक पातळ्यांवर अपयश आले. देशाचा कारभार करताना पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीवर अनेक वेळा टीका झाल्या. मोदी सभागृहात जास्त उपस्थित नसतात. काहीवेळा प्रश्‍नोत्तराच्या तासाला गैरहजर असतात. पंतप्रधानांच्याशिवाय कोणीही मंत्र्याला प्रसार माध्यमातून प्रसिद्धी मिळत नाही. राज्यांना अडवणूक करायची आणि केंद्राकडे बोट दाखवितात म्हणून त्यांच्यावर टीका करायची त्यामुळे सर्व कारणांमुळेच पंतप्रधानांची लोकप्रियता ढासळत चललेली दिसते त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. मध्यंतरी राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधानांचा चेहरा वापरू नये अशी प्रसारमाध्यमातून चर्चा झाली.

आज देशामध्ये महागाईचा प्रश्न आक्राळ-विक्राळ झाला आहे. केंद्र सरकारचे या प्रश्नावर लक्ष नाही. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहे. सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. घरगुती गॅस महाग झाला आहे. यामुळे भारतातील लोक सरकारवर नाराज आहेत. लोकांचा रोष कमी होण्यासाठी ‘राम मंदिर’ बांधकाम सारखा विषय चर्चेत आणून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. देशातील सर्व पक्ष भाजपा विरोधात एकत्र होण्याच्या मार्गावर आहेत. सत्तेतील भाजपा सरकारचे काही मित्र पक्ष नाराज होऊन सत्तेतून बाहेरही पडलेले दिसतात. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आमच्या समोर कोणी टिकू शकत नाही असा भाजपाचा भ्रम आहे. त्याला तडा जाण्याची शक्यता निर्माण झालेली दिसते. त्यामुळे भाजपाची लोकप्रियता पूर्वीपेक्षा ढ़ाळसताना दिसते भाजपाला केंद्रातून हटविण्यासाठी सध्या काही लोक जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहेत. भाजपा विरोधी नेत्यांनी अहंकार सोडल्यास एक भक्कम आघाडी होण्याची अडचण येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, आर.पी.आय, दलित महासंघ, वंचित आघाडी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट, जनता दल(से.) या सारख्या धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांनी एकत्र येण्यास काही हरकत नाही. एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा अनेक वर्षे सहकारी असलेल्या शिवसेना पक्षही विरोधी आघाडीत सामील होईल असे वाटते त्यामुळे भाजपाला २०२४ च्या निवडणुकीत मोठा संघर्ष करावा लागेल अशी दिसते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा सत्तेवर येण्यासाठी प्रसारमाध्यमांचा बराच सहभाग होता. आता प्रसारमाध्यमातील काही वाहिन्या किंवा वृत्तपत्रे भाजपावर नाराज झालेले दिसतात. लोकशाहीमध्ये मतदार मोठा असतो. देश कुणाच्या हातात घ्यायचा हे जनता ठरविते. या देशातील जनतेने अनेक वेळा शहाणपणाचे निर्णय घेतले आहेत. कोणत्याही अहंकारी पक्षाचा माज उतरविण्याची ताकद या देशातील जनतेच्या हातात आहे. ती शक्ति भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे.

One Reply to “गांधी इंग्रजांशी लढले माफीचा साक्षीदार झाले नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *