४१ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथे सुर्यवंशी पेट्रोलपंपाजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या प्रमोद पांडुरंग भोई (वय ३३ रा तुकाराम चौक,मुरगूड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन विक्री साठी आणलेला १ किलो ३०० ग्रॅम.वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण ४१ हजार ५०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अवैद्य व्यवसाय,अंमली पदार्थाची विक्री आणि साठा त्याच प्रमाणे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचने प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कडील तपास पथक नेमून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना माहिती मिळाली की,मुरगूड येथे असलेल्या सुर्यवंशी पेट्रोलपंपाजवळ मुरगूड येथे रहात असलेला प्रमोद भोई हा गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पोलिस पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून दि. २१सप्टे.रोजी छापा टाकला असता प्रमोद भोई याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गांजा मिळून आला.सदरचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हयांचा पुढ़ील तपास मुरगूड पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार रोहित मर्दाने ,विजय इंगळे,संजय पडवळ,अशोक पोवार ,हिदुराव केसरे,संदिप बेंद्रे आणि सुशील पाटील यांनी केली.