कोल्हापूर: गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डोंगळेना संघातील इतर संचालकांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे वृत्त आहे.

या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष अरुण डोंगळे वगळता संघाच्या सर्व संचालकांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर संचालकांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सर्व एक संघ आहोत आणि संघाच्या नियमित मासिक संचालक मंडळ मिटिंगसाठी एकत्र आलो होतो. आम्ही सर्वजण गोकुळ परिवार म्हणून आमच्या आघाडीच्या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करत आहोत आणि भविष्यातही एकजुटीने काम करत राहू.”

या निवेदनात अध्यक्षांचा उल्लेख नसल्याने आणि त्यांची अनुपस्थिती तसेच संचालकांच्या एकजुटीच्या निर्धारामुळे अरुण डोंगळे एकाकी पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. डोंगरेंच्या राजीनाम्याच्या अटकळांना या घडामोडींमुळे अधिक बळ मिळत आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. गोकुळच्या आगामी राजकीय घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.