कागल जवळ अपघातग्रस्त खड्डेच खड्डे
कागल / प्रतिनिधी : कागल शहरानजीक राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे व लांबलचक चर पडल्याने वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते आहे. खड्ड्यात दुचाकी व चार चाकी वाहने अडकून नुकसान होत आहे. शिवाय अपघात होऊन काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे खड्डेमय झालेला महामार्ग कधी सुधारणार अशी चर्चा वाहनधारकातून होत आहे.
पुणा-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हा रस्ता दळणवळणासाठी नामांकित रस्ता म्हणून गणला जातोय. पावसाळा संपला पण रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डे आणि लांबलचक चरीमुळे वाहनधारक हतबल झाले आहेत. साधे पॅचवर्क करायला व खड्डे मुजवायला बांधकाम खात्यास अद्याप मुहूर्त सापडत नाही. या रस्त्यावरून मंत्री -संत्री, आमदार- खासदार ,जात असतात .शासकीय अधिकारी सुद्धा या रस्त्याने प्रवास करीत असतात. पण रस्त्यावरील खड्डे त्यांना कदाचित जाणवत नसावेत ?असा सवाल इथं उपस्थित होतोय.
कागल बस स्थानकापासून ते दुधगंगा नदीपर्यंत खड्ड्यांची मोजणी केली तर शंभराहून अधिक मोठमोठे खड्डे व लांबलचक चर पडल्याचे चित्र पहावयास मिळते. खड्डा अधी की रस्ता आधी अशी जणू स्पर्धा लागल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते.
गुरुवारी सायंकाळी जोराचा पाऊस पडला. येथील आरटीओ तपासणी नाक्या च्या पूर्व बाजूस हॉटेल राजधानी समोर मोठे मोठे खड्डे पडलेले होते. ते पाण्याने भरलेले होते. ते न दिसल्याने त्यात दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. वाहनांचेही नुकसान झाले. हे पाहताच हॉटेल राजधानीचे चालक सामाजिक कार्यकर्ते जावेद नाईक यांनी अपघातातील वाहने बाजूला करून जखमींची विचारपूस करून त्यांना रुग्णालयात पाठविले .तसेच अपघात ठिकाणी तात्काळ बॅरेकेट्स लावून पुढील होणारे अपघात वाचविलेत ही बाब कौतुकास्पद आहे.