बातमी

10 वी-12 वी नंतर पुढे काय ?

इयत्ता 10 वी व  12 वी चा निकाल जाहिर झाला. या  10 वी-12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता पुढे काय करायचे? कोणत्या क्षेत्राकडे वळावे? काय निर्णय घ्यावा? याबाबत खूपच संभ्रमावस्था असेल. काही पालक विद्यार्थ्यांवर दबाव आणत असतात; आपल्या पाल्याने आपले अधुरे स्वप्न पूर्ण करावे किंवा आपल्या घरी अगोदरच जो व्यवसाय आहे तोच पुढे न्यावा किंवा इतर सर्वजण मोठ्या प्रमाणावर ज्या क्षेत्राकडे वळतात तोच मार्ग निवडावा किंवा किती गुण मिळालेत त्यानुसार साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर सायन्स; 50 टक्के ते 60 टक्के पर्यंत मिळाले तर कॉमर्स; आणि 50 टक्के पेक्षा कमी मिळाले तर आर्ट्स शाखा. अशा पद्धतीने अगोदरच पूर्वीच्या परंपरेनुसार निर्णय घेतले जातात.

वरील सर्व पर्याय चुकीचे आहेत असे नाही परंतु करिअरचे योग्य क्षेत्र निवडण्यासाठी केवळ हेच पर्याय डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय अचूक असेल असे सांगता येणार नाही तर करिअरचा योग्य पर्याय निवडण्यासाठी या पर्याया बरोबरच स्वतःची आवड, क्षमता, छंद, मिळविलेले प्रावीण्य, कौशल्य या गोष्टी विचारात घेऊन; भविष्यातील संधी ओळखून मगच योग्य पर्यायाची निवड करावी. ही निवड करताना पालक, शिक्षक, समुपदेशक, इंटरनेट, वृत्तपत्रे, पुस्तके ही माध्यमे तसेच शासनाचे महा करियर पोर्टल किंवा महाराष्ट्र करियर ॲप तसेच त्या त्या संबंधित क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती, उच्चशिक्षित नातेवाईक या सर्व घटकांकडून परिपूर्ण माहिती घ्यावी. संबंधित क्षेत्राचा अभ्यासक्रम पहावा त्यानंतरच सर्वांगाने विचार करून स्वतःसाठी योग्य असे करिअरचे क्षेत्र निवडावे.

      कोरोनाच्या महामारी नंतर करिअरच्या काही क्षेत्रांना खूप महत्त्व आले तर काही क्षेत्रे थोडी मागे पडली असे दिसत असतानाच पुन्हा एकदा करिअरची सर्वच क्षेत्रे नव्या जोमाने भरारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच अभ्यासक्रमाची प्रामुख्याने सात क्षेत्रांमध्ये विभागणी केलेली दिसून येते. ही सात क्षेत्रे म्हणजेच आर्टस्, कॉमर्स, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, ललितकला, गणवेशधारी सेवा ही आहेत. आर्ट्स (कला) किंवा हयुमॅनिटीज् ही शाखा निवडताना ज्यांना भाषा, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र,भूगोल या विषयांमध्ये रुची असेल, वाचनाची आवड असेल, संवाद कौशल्य चांगले अशा विद्यार्थ्यांना या शाखेची निवड करण्यास हरकत नाही. वाणिज्य किंवा कॉमर्स शाखा निवडताना विद्यार्थ्यांना संख्या विषयक आवड, व्यवसाय-व्यापार यांची आवड असेल, बँकिंग, व्यवस्थापन, अकाउंटिंग या विषयांमध्ये रुची असेल तर विद्यार्थी ही शाखा निवडू शकतो.

पुढे काय ?

अभियांत्रिकी शाखेकडे वळायचे असल्यास विद्यार्थ्यांनी प्रथम अभियांत्रिकी मधील सर्व शाखांची माहिती घ्यावी. सध्या या क्षेत्रांमध्ये 60 पेक्षा जास्त उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. स्वतःला यातील कोणती शाखा निवडायची आहे त्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा. जे विद्यार्थी वैद्यकीय किंवा त्या संबंधित अभ्यासक्रम घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना बारावी सायन्स नंतर नीट प्रवेश परीक्षा देऊन मेडिकलच्या विविध कोर्सेसना प्रवेश घेता येतो. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज च्या अभ्यासक्रमांना सुद्धा नीट परीक्षा अनिवार्य आहे. औषधनिर्माणशास्त्र, संशोधन या क्षेत्रांकडे ही वळता येते. कृषी क्षेत्राकडे जाण्यासाठी बारावी सायन्स नंतर सीईटी, जेईई,नीट या प्रवेश परीक्षेद्वारे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. कृषीशास्त्रामध्ये एकूण 23 उपशाखा आहेत. महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत त्या शिवाय काही खाजगी कृषी कॉलेजेस आहेत. या क्षेत्राच्या अधिक माहितीसाठी www.mcaer.org या संकेतस्थळाला भेट द्या. ललितकला म्हणजेच फाईन आर्ट्स. ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट, फॅशन, गेम डिझाईन, ग्राफिक डिझाईन, ब्युटी अँड वेलनेस, संगीत, वेब डिझाईनिंग, नृत्य-नाट्य- अभिनय, होमसायन्स, चित्रकला इ. सर्व प्रकारच्या कला या क्षेत्रामध्ये येतात.

            गणवेशधारी सेवा या क्षेत्रामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रेल्वे बोर्ड, खाजगी सुरक्षा व्यवस्था, संरक्षण उत्पादन क्षेत्र, अशा विविध शाखांमध्ये शिक्षण घेता येते आर्मी (भूदल) या सेनादलात प्रवेशासाठी बारावी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. परंतु नेव्ही (नौदल) व एअरपोर्ट (वायुदल) या सेनादलात प्रवेशासाठी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतून पी सी एम हा ग्रुप असणे आवश्यक असते.

            या क्षेत्रांबरोबरच क्रीडा,विधी (लॉ), अध्यापन, कमवा व शिका, व्यावसायिक शिक्षण, एमपीएससी, युपीएससी, शारीरिक शिक्षण अशी विविध क्षेत्रे आहेत यांचाही विचार करावा. भविष्यामध्ये टॉप 10 करिअरची क्षेत्रे म्हणून व्यावसायिक कलाकार (कमर्शियल आर्टिस्ट), आरोग्य सेवा (हेल्थ केअर) पर्यावरण पूरक सामाजिक कार्यकर्ते (इकोफ्रेंडली सोल्युशन्स) मशीन शिक्षणतज्ञ (मशिन लर्निंग) विधीतज्ञ, कायदेपंडित (लीगल ॲडव्हायझर), डेटा विज्ञान तज्ञ (डेटा सायन्स), मानसशास्त्र (सायकॉलॉजी), गेमिंग,कचरा व्यवस्थापन,(वेस्ट मॅनेजमेंट) आणि लीडरशिप (नेतृत्व) ही क्षेत्रे उदयोन्मुख करीयरची क्षेत्रे म्हणून सांगता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

सर्व दहावी-बारावीच्या  विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी व उज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! 

सरला अविनाश पाटील (जिल्हा समुपदेशक)

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *