एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी आ. सदाभाऊ खोत व आ. पडळकरांचीही चौकशी करा!
मुंबई, दि. १२ एप्रिल :
एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले असून जवळपास ७० ते ७५ हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोघांना या वसुलीतील किती हिस्सा मिळाला? कशाच्या आधारे ही वसुली केली? याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, हजारो एस. टी. कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात पाच महिने आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकार या कामगारांच्या पाठीशी पहिल्यापासून खंबीरपणे उभे होते, पगारवाढीसह त्यांच्या इतर मागण्याही मान्य केल्या आहेत. परंतु यादरम्यान कामगारांकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतले गेल्याचे उघड झाले आहे. काही एस. टी. कामगारांनी त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोन्ही आमदारांना या वसुलीतील हिस्सा मिळाला का? कोणत्या आधारे त्यांनी ही वसुली केली ? या वसुलीतील वाटपावरूनच सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांचे वकील सदावर्ते गुणरत्ने यांच्याशी वाद होऊन बाहेर पडावे लागले का, याचा खुलासा झाला पाहीजे असे लोंढे म्हणाले.