शेंडूर येथे सव्वा चार कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन
व्हनाळी : सागर लोहार
कल्याणकारी मंडळे कढून कामगारांची नोंदणी करून चार कोटी कामगारांच्या सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शेंडूर ता. कागल येथे सव्वा चार कोटी रूपयांच्या विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्नपूर्णा शुगर चे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गेली ३५ वर्षे माझ्यात व संजय घाटगे यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष झाला,मात्र आयुष्याच्या उतारवयात तालुक्याचा विकास करण्यासाठी आणि तालुक्यातील शेवटच्या माणसांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. धनगर समाजासाठीही या कामगार योजना राबवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, संघर्ष करून आणि झगडून विकास होत नाही.मंत्री मुश्रीफ यांनी विरोधक असूनही अन्नपूर्णा शुगर कारखान्यासाठी आर्थिक मदत केली आहे, म्हणूनच त्यांच्यासोबत राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. मागणा-याची झोळी फाटेल परंतु हसन मुश्रीफ साहेब यांच्यासारख्या देणारा दमणार नाही. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे राहू या.असेही ते म्हणाले.
यावेळी सरपंच अमर कांबळे,लक्ष्मण गोरडे,
संदीप लाटकर,सुखदेव मेथे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कोविड योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबुराव शेवाळे व सुशांत डोंगळे यांचा सत्कार केला.
व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील,अंबरिषसिंह घाटगे,माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, एम.बी.पाटील, मधुकर मेथे, गुणाजीराव निंबाळकर, दत्तात्रय पाटील,शिवसिंह घाटगे, धनराज घाटगे युवराज कोईगडे, युवराज पाटील, बाळासाहेब तुरंबे आदी उपस्थित होते.
स्वागत उपसरपंच अजित डोंगळे यांनी केले.आभार संजय डोंगळे यांनी मानले.
मुश्रीफ महाराष्ट्रातील आदर्शवत मंत्री…
सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी रात्रंदिवस झगडणारे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब हे महाराष्ट्रातील एकमेव आदर्शवत मंत्री आहेत. असे गौरवोद्गार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताच उपस्थितांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली.