कागल( सलीम शेख): कागल तालुक्यातील चिमगांव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नातेवाईकांनी आणलेला केक खाल्ल्याने दोन बालकांचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार, ३ जुलै रोजी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिमगांव येथील रणजित नेताजी आंगज यांच्या चार वर्षांच्या मुलाला श्रीयांश आणि सात वर्षांच्या मुलीला काव्या यांनी नातेवाईकांनी आणलेला केक खाल्ला होता. केक खाल्ल्यानंतर दोघांनाही उलट्या होऊ लागल्या. त्यांना तातडीने मुरगूड येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, श्रीयांशची प्रकृती बिघडत गेली आणि मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. तर, काव्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, मंगळवारी सायंकाळी उपचाराअभावी तिचाही मृत्यू झाला.
रणजित आंगज हे पुण्यात राहत होते. कंपनीने सुट्टी दिल्यामुळे ते सहा महिन्यांपासून गावी आले होते. ते मुरगूड येथील एका खासगी दवाखान्यात काम करीत होते. त्यांचा मुलगा श्रीयांश अंगणवाडीत, तर मुलगी काव्या चिमगांवच्या प्राथमिक शाळेत शिकत होती. घटनेनंतर आंगज यांच्या घरी ग्रामस्थांनी गर्दी केली. तपासणीत असे लक्षात आले की, नातेवाईकांनी आणलेला केक कालबाह्य होता. याच कारणामुळे मुलांना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बहीण-भावांच्या अकाली निधनाने चिमगांव परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ आणि नातेवाईक या दुर्घटनेने हळहळ व्यक्त करत आहेत.