
कागल(विक्रांत कोरे) : कागलच्या फाईव्ह स्टार MIDC परिसरात म्हसोबा मंदिराजवळ ट्रकच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडला.
याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमर अशोक कदम (वय २५, रा. सुळकाई, ता. विटा, जि. सांगली, सध्या रा. कागल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि हेमंत मोहन कदम (वय २८, रा. फलटन, जि. सातारा, सध्या रा. कागल) बजाज पल्सर (MH-10-EG-5461) दुचाकीवरून कामावर जात होते.

याच दरम्यान, ट्रक (MH-09-CV-6392) चालकाने भरधाव वेगाने, राँग साईडने येत रहदारीकडे दुर्लक्ष करून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी अमर कदम यांच्या बरगडीला व दोन्ही पायांना गंभीर मार लागला, तसेच हेमंत मोहन कदम यांच्या डोक्याला व हनुवटीला दुखापत झाली. दोघांवर सिटी प्राईड हॉस्पिटल, कागल येथे उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २८१, १२५ (अ), (ब) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तबसूम मगदूम या करीत आहेत.