कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोमय्या यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच समरजितसिंह घाटगे यांचा योग्यवेळी पैरा फेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाने १२७ कोटींचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यावर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले. मी येत्या २ आठवड्यात सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापुरात फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
विनाकारण भाजपची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्ये करु नका. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात हजारो शेतकऱ्यांची गुंतवणूक आहे. पण याची कल्पना सोमय्यांना नाही. सोमय्यांना कारखान्याचे नावही घेता येत नाही. त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील १० वर्षात भाजपला स्थान नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची गुंतवणूक असल्याची त्यांना माहिती नसावी. त्यांनी खुशाल हवी तिथं तक्रार करावी असे आव्हानही त्यांनी दिले. सोमय्यांनी केलेल्या आरोपामुळे कोल्हापुरात भाजपचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले.