ताज्या घडामोडी

धर्माचा वापर करून मतांची बँक बळकट केली जात आहे

2014 सालापासून देशात सत्ता कोणाची आणायची ही प्रसारमाध्यमेच ठरवायला लागली आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांवरील लोकांचा विश्वास कमी होताना दिसतो. सध्याचे प्रसार माध्यमांचे चित्र लोकशाहीला घातक आहे असे दिसते. वृत्तपत्रे समाजाची गरज आहे. वृत्तपत्रामुळेच लोकशाही जिवंत आहे असे वाटत होते. पण वृत्तपत्रे प्रामाणिकपणाने काम करताना दिसत नाहीत. ती भांडवलदारांची बटिक झाली आहेत. वास्तविक वृत्तपत्रे जर प्रामाणिकपणाने काम करत असतील तर प्रशासनावरही चांगला अंकुश राहतो. थोडक्यात जग बदलण्याची शक्ती वृत्तपत्रांच्या मध्ये आहे. असे असताना त्यांनी प्रामाणिकपणे जर काम केले नाही तर ते देशासाठी पर्यायाने समाजासाठीही घातक आहे. समाजाला ज्याला कुणी वाली नाही अशांना माणूसपण देणारी पत्रकारिता असून तिचा सामान्य माणसांना बळ देण्यासाठी वापर झाला पाहिजे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी वृत्तपत्र क्षेत्रात चांगले योगदान दिले. 

सुरुवातीच्या काळामध्ये दर्पण, ज्ञानप्रकाश, प्रभाकर, निबंधमाला ही नियतकालिके समाजाच्या प्रबोधनासाठी पुढे आली. या वृत्तपत्राचा हेतू समाज जागृती हाच होता. लोककल्याण, समृद्धी, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट, रूढी, परंपरा निर्मूलन अशा विषयावर त्यांचा भर होता. सुधारणांच्या बाजूने प्रचार करून समाजातील वैगुण्यांची चिरफाड करणे हा त्यांचा उद्देश होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचे लिखाण तर सनातनी मंडळींना झोंबणारे होते. त्यामुळे जोतिबांचे लिखाण छापण्याची सर्व वृत्तपत्रांनी असमर्थता दाखवली. सर्व वृत्तपत्रांनी आपले लिखाण छापण्यास आमच्या वृत्तपत्रात जागा मिळणार नाही असे त्यांना कळवले. अखेर ख्रिस्ती पत्रकांनी जोतिरावांच्या लिखाणाला जागा दिली. जोतिबांच्या काळात समाजात शिक्षण घेतलेली मुठभर लोक होते. आपले विचार राबणाऱ्या बहुजन समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना शिक्षणाची गरज आहे ही बाब जोतिरावांच्या लक्षात आली. आपण बहुजनांना शिक्षण दिले तर सनातनी धर्ममार्तंडांच्या मकलाशा त्यांच्या लक्षात येतील व लोक शहाणे होतील असे त्यांना वाटू लागले. म्हणून ज्योतिबांनी आपल्या घरापासूनच शिक्षणाची सुरुवात केली. आपली पत्नी सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या त्यांना शिक्षण देण्याचा निर्णय झाला व सावित्रीबाईंचे शिक्षण चालू झाले. आपल्या बांधवांना शिक्षण दिल्याशिवाय आपण काय लिहिले हे त्यांना समजणार नाही म्हणून फुले दांपत्यांनी पुण्यामध्ये शाळा चालू केली. आणखीन एक अडचण जोतिबांच्या समोर उभी राहिली. बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ या नावाचा छोटासा परखड ग्रंथ लिहिला होता. ते पुस्तक पुरुषांच्या अस्मितेला व स्वाभिमानाला आव्हान देणारे होते. हे पुस्तक छापण्यासाठी अनेक छापखान्यानी नकार दिला. परंतु ज्योतिबांनी ताराबाईंना पुस्तक छापून मिळण्यासाठी उघड मदत केली. ताराबाई शिंदे आणि सावित्रीबाई फुले या दोघी समकालीन असतानाही ताराबाई यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे असे आम्हास वाटते. इतिहासाने ताराबाई शिंदे यांच्या योगदानाची फारशी दखल घेतली नाही असे आम्हास वाटते.

महात्मा ज्योतिबा फुले यांची सत्यशोधकी पत्रकारिता हीच खरी पत्रकारिता आहे. त्यांची पत्रकारिता मानवतावादाकडे घेऊन जाणारी आहे. पुढे जोतिबांचे अनेक सहकारी वृत्तपत्र क्षेत्रात उतरून त्यांनी ती त्याच विचाराने पुढे चालवली. ज्योतिबांची पत्रकारिता पुढे चालावी म्हणून त्यांचे सहकारी धावून आले. या सर्वांनी मानवतावादी शाश्वत असणारा सत्यशोधकी विचार सोडला नाही. त्यामध्ये कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मुकुंदराव पाटील, भगवंतराव पाळेकर, शामराव देसाई (बेळगाव), खंडेराव बागल, माधवराव बागल, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जवळकर, अण्णासाहेब लठ्ठे, बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. या लोकांनी पत्रकारिता समृद्ध केली. त्यांनी पोटभरू पत्रकारिता न करता लोकजागृती केली.

भारतातील पत्रकारिता स्वातंत्र्य चळवळीत विकसित झाली. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या देशात जी आंदोलने झाली ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम वृत्तपत्रांनी केले. इंग्रजी सत्तेचा मोठा दबाव असताना खंभीरपणाने लोकांना जागृत करण्याचे काम वृत्तपत्राने केले. स्वराज्यासाठी जनतेची मने पेटवण्याचे कामदेखील सर्व वृत्तपत्रांनी केले. इग्रजांची दीडशे वर्ष असणारी जुलमी सत्ता उलथवून टाकण्याची किमया वृत्तपत्रानी केली. स्वातंत्र्य आंदोलनात चळवळीत नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचीही स्वतःची वृत्तपत्रे होती. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांनी स्वतःची वृत्तपत्रे चालवली. आपले परखड विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची ते एक मोठे साधन होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायदेमंडळ, लोकशाही, न्यायपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था लोकांना परिचय करून देण्यामध्ये वृत्तपत्रांनी चांगली कामगिरी केली. एकंदरीत स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही रुजवण्यामध्ये वृत्तपत्रांचा सिंहाचा वाटा आहे. हातामध्ये तलवार न घेता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आपण स्वातंत्र्य मिळवले. त्यामध्ये देशातील वृत्तपत्रांचा सहभाग फार मोठा आहे. इंग्रजांच्या विरोधात लोकांना भडकवण्याचे   काम गांधीजींनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केले हे नाकारता येणार नाही. त्यामुळे गांधीजींना लोकांचा पाठिंबा मिळाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले.

सध्या मात्र समाजातील मूल्यांची घसरण होत असताना काही ठराविक मोजकेच पत्रकार भान ठेवून काम करीत आहेत. अशा पत्रकारांना कोंडीत पकडणे, ठार मारण्याचा धमक्या देणे, नोकरीवरून कमी करण्याची तंबी देणे हे धोके पत्करून काही पत्रकार मंडळी काम करीत आहेत. देशात अनेक पत्रकारांचे खून झाले आहेत. जीव मुठीत घेऊन त्यांना काम करावे लागते. काही धाडसी पत्रकार दहशत असतानाही धाडसाने काम करीत आहेत. त्यामध्ये रविष कुमार, राजदीप सरदेसाई, राणा आयुब, सागारीका घोष, बरखा दत्त, नितीन वागळे यासारखे लढाऊ पत्रकार सनातनी प्रवृतीला धाडसाने तोंड देत आहेत. हिंदुत्वाचा नारा देऊन देशात जातिभेदाची दरी वाढवण्याचे काम सध्या जोरात चालू आहे. द्वेष प्रेरित झुंडी हिंदू विरुद्ध मुस्लिम चौकट तयार करून बेगडी राष्ट्रवाद फैलावत आहेत. लव्ह जिहादचा मुद्दा पुढे करून अल्पसंख्याकांना भीती दाखवण्याचे काम चालू आहे. समाज अस्वस्थ व्हावा इतका धर्म द्वेष वाढवला जातोय. अल्पसंख्यांकांना भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. धर्माचा वापर करून मतांची बँक बळकट केली जात आहे. देशातील बडे भांडवलदार सनातनी प्रवृत्ती वाढवणाऱ्यांना पैसा पुरवठा करीत आहेत. त्याच्या मोबदलात भांडवलदार लोक अनेक आर्थिक सवलती लाटत आहेत. सामान्य जनतेला यातील काहीच समजत नाही. त्यांचा आवाज दाबला आहे. सुसंस्कृत चर्चा, संवाद, सामाजिक सुसंवादाची जागा द्वेषाने घेतल्या असून सनातनी वृत्तीचे लोकप्रतिनिधी व भांडवलदारांच्या आहारी गेलेली वृत्तपत्रे लोकांचा घात करीत आहेत, कठोर सत्यनिष्ठ असणारे फार थोडे पत्रकार आहेत. प्रभावीपणे सत्य मांडण्याचे धाडस असुनही मालक, संपादक यांच्या दबावामुळे मनात असूनही त्यांना सत्य मांडता येत नाही.

देशात जीवघेणी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, धार्मिक द्वेष, ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे सामान्य जनता अस्वस्थ आहे. प्रसारमाध्यमे हे वास्तव दाखवत नाहीत. अलीकडेच राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा फार मोठी निघाली. देशभरातील लाखो लोक दररोज सामील होत असत. प्रसारमाध्यमांनी यात्रेचे सत्य दर्शन दाखवले नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमे  कुणाचेतरी बटिक झाली आहेत अशी शंका येते. जेव्हा तोफा आणि तलवारी निकामी होतात तेव्हा पत्रकारांच्या लेखण्या धावून येतात. पण तसे घडताना दिसत नाही. म्हणून पत्रकारांनी सत्य मांडावे. सारा देश तुमच्याकडे आशेने व आदराने पाहत आहे.

– दलितमित्र एस.आर.बाईत, सुरुपली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *